पीओपी मूर्तींवर राहणार मनपाचा ‘वॉच’; विसर्जनस्थळाच्या क्षमतेनुसारच गणेशमूर्तींची ठेवावी लागणार उंची
By साईनाथ कुचनकार | Published: August 2, 2023 03:29 PM2023-08-02T15:29:39+5:302023-08-02T15:32:38+5:30
मूर्तिकार व मातीच्या मूर्तीची विक्री करणारे विक्रेते या दोघांनाही मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक
चंद्रपूर : मागील वर्षापासून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने रामाळा तलाव येथे विसर्जन करणे बंद करून ईरई नदीकाठावर विसर्जन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या स्थळी पाण्याची खोली ही ६ ते ८ फूटपर्यंत असते. त्यामुळे मूर्तिकार व गणेश मंडळांना विसर्जनस्थळाच्या क्षमतेनुसारच गणेशमूर्तींची उंची ठेवावी लागणार आहे. विशेष म्हणजे, पीओपीच्या मूर्तीवरसुद्धा मनपा ‘वाॅच’ ठेवणार आहे.
चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव पूर्वतयारीसाठी विविध विभागांचे अधिकारी आणि मूर्तिकार यांची बैठक मनपा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयुक्त विपीन पालिवाल, अपर आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त अशोक गराटे, पोलिस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, सुजित बंडीवार, सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, राहुल पंचबुद्धे, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. अमोल शेळके, नितीन रामटेके, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आणि मूर्तिकार प्रतिनिधी उपस्थित होते.
पीओपी मूर्तीं बनविली, विक्री केल्यास दंडात्मक कारवाई
यावर्षी झोननिहाय पथकांद्वारे प्रत्यक्ष आणि गुप्त पद्धतीने मूर्तींची तपासणी केली जाणार आहे. मूर्तिकार व मातीच्या मूर्तीची विक्री करणारे विक्रेते या दोघांनाही मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी न करता मूर्तीची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नोंदणी आपापल्या परिसरातील झोन कार्यालयात करायची असून, पीओपी मूर्तीची विक्री, आयात आणि निर्मिती करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल होणार आहे.
मूर्तीची खरेदी करताना ती मातीचीच असल्याची प्रमाणित पावती ग्राहकांनी घ्यावी. मूर्तिकारांनी आपल्या स्वाक्षरीनिशी संपर्क क्रमांकासह पावती द्यावी. कृत्रिम कलश, रथ, निर्माल्य कलश यांची व्यवस्था राहणार असून, शासनस्तरावर पर्यावरणपूरक गणेशोस्तव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होऊन सर्वांनीच गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा.
- विपीन पालीवाल, आयुक्त, मनपा