चंद्रपूर मनपा शाळेची इतर जिल्ह्यांच्या शिक्षकांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:29+5:302021-08-21T04:32:29+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांच्या बोलक्या भिंती, नेटकी बसण्याची व्यवस्था, पिण्याचं स्वच्छ पाणी, अग्निशमन बंब, पंखे आहेत. महापालिकेच्या ...
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांच्या बोलक्या भिंती, नेटकी बसण्याची व्यवस्था, पिण्याचं स्वच्छ पाणी, अग्निशमन बंब, पंखे आहेत. महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि तेलगू शाळा शहरात सुरू आहेत. या शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण सुरू केल्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. या शाळांची माहिती जाऊन घेण्यासाठी राज्यभरातील इतर जिल्ह्यांतील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शाळांना भेट देत माहिती जाणून घेतली.
कोरोना संकटामुळे शाळा बंद आहे. अशावेळी ऑनलाइन शिक्षणाची सोय चंद्रपूर महापालिकेने सुरू केली. ज्या विद्यार्थांकडे ऑनलाइन सुविधा नाही, अशासाठी त्यांच्या घरी जाऊन ऑफलाइन शिक्षण देण्यात आले. ज्यांना कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा मोठी संधी निर्माण करून देणारी ठरत आहे. हा उपक्रमशील प्रयोग बघण्यासाठी शिष्टमंडळ चंद्रपूर शहरात आले होते.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण २९ शाळा आहेत. यामध्ये तीन शाळांत तेलुगू, तीनमध्ये हिंदी, दोनमध्ये उर्दू शिक्षण दिलं जात असून, २१ शाळांत मराठी-सेमी इंग्रजी शिकविल्या जाते. चंद्रपूर मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नित यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली.