'त्या' शिर नसलेल्या मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले; 'या' कारणावरून मैत्रिणीनेच केला ‘तिचा’ घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 10:12 AM2022-04-11T10:12:49+5:302022-04-11T10:37:02+5:30

भद्रावतीतील गवराळा शेत शिवारातील परिसरात ४ एप्रिलला २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या रहस्यमय खून प्रकरणाचा पडदा अखरे हटला आहे.

Chandrapur Murder Case mystery solved : that young woman killed by her handicapped roommate | 'त्या' शिर नसलेल्या मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले; 'या' कारणावरून मैत्रिणीनेच केला ‘तिचा’ घात

'त्या' शिर नसलेल्या मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले; 'या' कारणावरून मैत्रिणीनेच केला ‘तिचा’ घात

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील हत्या प्रकरण

चंद्रपूर : भद्रावती येथे निर्वस्त्र शिर नसलेल्या तरुणीच्या रहस्यमय खून प्रकरणाचा पडदा अखरे हटला आहे. शनिवारी त्या मुलीची ओळख पटल्यानंतर त्या प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

मृत युवतीच्या विधिसंघर्षग्रस्त रूममेटनेच आपसी वादातून आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या मित्राच्या साहाय्याने तिची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्या मुलीचे शिर व हत्येत वापरलेली हत्यारे पोलिसांना सापडली नाहीत. त्या विधिसंघर्षग्रस्त बालिकेच्या मित्राचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मृत तरुणी व तिची विधिसंघर्षग्रस्त रूममेट या चंद्रपूर व नागपूर येथे एकत्रच राहत होत्या. काही महिन्यांपासून त्या दोघींमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊ लागले होते. मृत युवती तिच्या इतर मित्रासमोर तिचा अपमान करत होती. ही बाब तिला खटकत होती. त्यामुळे तिने तिचा काटा काढण्याचा निश्चय केला. याबाबत तिने आपल्या मित्राला सोबत घेऊन कट रचला.

दरम्यान, ३ एप्रिल रोजी तिला नागपूर येथून चंद्रपूर येथे बोलविले. रात्री ८.४५ वाजता चंद्रपूर वरोरा नाका येथे आल्यानंतर तिने मित्राच्या साहाय्याने तिला भद्रावती परिसरातील निर्जनस्थळी नेले. रात्री १२ वाजताच्या सुमारास विधिसंघर्षग्रस्त बालिकेने मृत तरुणीला मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर तिचे पाय पकडून मांडीवर चाकूने वार केले. नंतर तिची ओळख पटू नये म्हणून दोघांनीही मृत तरुणीचा आळीपाळीने गळा कापला. तसेच शरीरावरील कपडे व शिर घेऊन पसार झाले.

स्थानिक गुन्हे शाखेने सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणाचा उलगडा करून त्या विधिसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेतले आहे. परंतु, तिचा मित्र अद्यापही फरार आहे. मृत मुलीचे शिर तसेच हत्येसाठी वापरलेले हत्यार अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. लवकर त्या फरार आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, आदी उपस्थित होते.

अनेक प्रश्न अनुत्तरित

मृत तरुणीच्य हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे आणखी या प्रकरणाचे रहस्य वाढले आहे. या हत्येत आरोपींची संख्या किती, आरोपी कोणत्या जिल्ह्यातील आहे, हत्येमागे दुसरे कोणते कारण आहे, मृत मुलीचा रूममेटशी वाद असतानाही ती तिच्या बोलावण्यावरून चंद्रपूरला आली कशी, हत्येसाठी चंद्रपूर-भद्रावती शहरच का निवडले, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.

सहा दिवसानंतर आढळले शिर

भद्रावती येथे ४ एप्रिल रोजी निर्वस्त्र अवस्थेत शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. मागील सहा दिवसांपासून पोलीस 'त्या' युवतीचे शिर शोधत होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी इरई नदीपुलाखाली शिर व युवतीचे कपडे एका स्कार्फमध्ये गुंडाळून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आढळून आले. सहा दिवसांपूर्वी हत्या झाल्याने चेहरा खराब झाला आहे.

घटनास्थळाची केली होती रेकी

तिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने त्या घटनास्थळाची रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी कट रचून मृत युवतीला घटनास्थळी घेऊन गेले. त्यानंतर धारदार चाकूने तिचेे शिर कापण्यात आले. परंतु, पोलिसांनी तांत्रिक बाबींचा तपास करून या प्रकरणाचा छडा लावला आहे.

आठ पथकांद्वारे तपास

भद्रावतीला निर्वस्त्र मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ माजली. या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी उपविभागातील पाच व स्थानिक गुन्हे शाखेची तीन अशी आठ पथके तयार केली. सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Chandrapur Murder Case mystery solved : that young woman killed by her handicapped roommate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.