चंद्रपूर-नागपूर महामार्गच गिळंकृत; ट्रॉन्सपोर्ट कंपन्यांनी केला कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:48 IST2025-03-21T16:47:58+5:302025-03-21T16:48:36+5:30

सार्वजनिक सुरक्षा धोक्यात : अपघातांना कारणीभूत ठरत असतानाही दुर्लक्ष

Chandrapur-Nagpur highway swallowed up; Transport companies took over | चंद्रपूर-नागपूर महामार्गच गिळंकृत; ट्रॉन्सपोर्ट कंपन्यांनी केला कब्जा

Chandrapur-Nagpur highway swallowed up; Transport companies took over

राजेश भोजेकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
चंद्रपूर-नागपूर हा महामार्ग चंद्रपूर महानगराचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वारच ट्रॉन्सपोर्ट कंपन्यांनी गिळंकृत केले आहे. पाण्याच्या टाकीपासून ताडाळी आणि पडोली ते घुग्घुसपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजाराच्या घरात ट्रक, ट्रॅव्हल्ससह अन्य वाहने बिनदिक्कतपणे उभी असतात. यावर कोणाचेच निर्बंध नाही का? असा सवाल अन्य वाहनधारकांना पडतो आहे.


'लोकमत'ने अलीकडेच फ्लाय अॅशच्या नियमबाह्य वाहतुकीकडे लक्ष वेधले. या प्रकरणात चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत फ्लाय अॅश डेपोच बंद पाडला. मात्र वीजनिर्मिती केंद्राकडून अद्यापही सुरक्षित वाहतुकीचा तोडगा निघाला नसल्याचे समजते. याच फ्लाय अॅशने अलीकडेच एका एसटी वाहकाचा नाहक बळी घेतला. याप्रकरणात पोलिसांनी एसटी धडकलेल्या ट्रकमालकाऐवजी चालकावर गुन्हा दाखल केला. ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक पलटी होऊन रस्त्यावर फ्लाय अॅश पसरली. त्या ट्रॉन्सपोर्ट कंपनीवर मात्र मेहरनजर दाखविली. पडोली चौक परिसरात रोज किती अपघात होते. याचा साक्षीदारच हे पोलिस ठाणे आहे. तरीही या वाहनांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 


मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायमूर्ती आले की रस्ता मोकळा
चंद्रपूरात राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायमूर्ती वा अन्य मोठी व्यक्ती दौऱ्यावर येण्यापूर्वी चंद्रपूरसह त्यांचा मार्ग असलेले रस्ते मोकळे होतात आणि ते गेल्यानंतर पुन्हा 'जैसे थे' स्थिती होते, असे का होते? असाही सवाल आहे.


रस्ते सुरक्षा समितीचे काम काय ?
रस्ते सुरक्षा समिती केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह, पंधरवडा साजरा करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे दिसून येते. ट्रॉन्सपोर्ट कंपन्यांच्या ट्रकसह अन्य वाहनांवर कारवाया करून हा मार्ग अपघात मुक्त करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. महामार्ग पोलिस, वाहतूक नियंत्रक विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाने एकत्र येऊन संबंधितांवर २८५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची हिम्मत दाखवावी, अशी मागणी आहे.


लोकप्रतिनिधी जाणिवपूर्वक डोळेझाक करीत आहे का?
मंत्रालयात जाण्यासाठी बहुतांश लोकप्रतिनिधींचा हाच मार्ग आहे. या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहने नियमबाह्यपणे पार्किंग करून असतात. ही वाहने लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? सर्वांनी एकजुटीने विचार केला तर हा मार्ग केव्हाही मोकळा होऊ शकतो.

Web Title: Chandrapur-Nagpur highway swallowed up; Transport companies took over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.