Chandrapur: वेकोलि अधिकारी तसेच प्रशासनाला पिपरे (देश.)च्या महिलांचा निर्वाणीचा इशारा
By साईनाथ कुचनकार | Published: June 18, 2023 04:15 PM2023-06-18T16:15:44+5:302023-06-18T16:16:39+5:30
Chandrapur: मागील वर्षी भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) येथे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
- साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : मागील वर्षी भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) येथे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पुरामध्ये गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीनंतर लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी गावाला भेट देत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वर्ष लोटत असतानाही काहीच उपाययोजना झाल्या नाही. त्यामुळे आता गावातील नागरिकांसह महिलाही एकवटल्या असून त्यांनी गावात बैठक घेत शासन तसेच प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला असून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
मागील वर्षी पिपरी (देश) येथे पुरामध्ये मोठे नुकसान झाले. पूरपरिस्थिती बघण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, दिवंगत खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, तत्कालीन जिल्हाधिकारी गुल्हाने, जिल्हा कृषी अधीक्षक बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार सोनवणे आणि बऱ्याच अधिकाऱ्यांनी गावाला भेट देत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काहीच उपाययोजना झाल्या नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना निवेदनही दिले. ग्रामस्थांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर मार्च महिन्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने डॉ. विजय इंगोले, एसडीओ शिंदे, तहसीलदार सोनवणे यांच्या उपस्थितीत ड्रोनमार्फत चित्रीकरण करण्यात आले.
दरम्यान, २९ एप्रिलला वेकोलि क्षेत्रीय महाप्रबंधक आभास चंद्र सिह आणि वेकोलि अधिकाऱ्यांनी पिपरी गावाला भेट दिली. त्यांनीही आश्वासन दिले. मात्र, आता पावसाळा अगदी तोंडावर असतानाही काहीच झाले नसल्याने गावातील नागरिकांची पावसाळ्यापूर्वीच झोप उडाली आहे. त्यामुळे आता नागरिकांसह गावातील महिलांनी एकत्र येत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
शेतात साचली होती राख
मागील वर्षी या गावातील शेतजमीन पुराच्या पाण्याखाली होती. पूर ओसरल्यानंतर मात्र जमिनीमध्ये सर्वत्र राखेचा थर साचला होता. त्यामुळे जमीन नापीक झाली. शेतकऱ्यांनी कशीबशी करून जमीन पेरणीसाठी सज्ज केली आहे. मात्र, पुन्हा पावसाळ्याच तीच स्थिती झाल्यास काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.