चंद्रपूर पोलिसांनी केला ५४ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट
By परिमल डोहणे | Published: June 26, 2024 08:31 PM2024-06-26T20:31:32+5:302024-06-26T20:31:48+5:30
चंद्रपूर : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर पोलिसांनी बुधवारी मे. सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल (इंडिया) प्रा. लि., ...
चंद्रपूर : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर पोलिसांनी बुधवारी मे. सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल (इंडिया) प्रा. लि., एमआयडीसी चंद्रपूर येथे ५४ किलो ६४५ ग्रॅम अमली पदार्थाचा साठा जिल्हा ड्रग्ज डिस्पोजल कमिटीकडून पंचासमक्ष जिल्हा न्यायालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीने जाळून नष्ट करण्यात आला. विशेष म्हणजे, मागील वर्षी अकराशे किलो अमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला होता.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनअंतर्गत दाखल गुन्ह्यांपैकी २७ गुन्ह्यांतील अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याचा आदेश न्यायालयाकडून मिळाला होता. त्यानुसार बुधवारी ५४ किलो ६४५ ग्रॅम अमली पदार्थांचा साठा जाळून नष्ट करण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पडोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर उपस्थित होते.
अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जागरूकता
नशेमध्ये अडकलेल्या एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम होतात व एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते, अशा नशेत आहारी गेलेल्या लोकांचे जीवन वाचवणे, प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्या मध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने चंद्रपूर पोलिसांनी साठा नष्ट केला.