प्रयत्न कमी पडल्यानेच चंद्रपूर प्रदूषित
By admin | Published: June 5, 2014 11:53 PM2014-06-05T23:53:58+5:302014-06-05T23:53:58+5:30
चंद्रपूरचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा तयार केला. मात्र विकासाची गती
पत्रकार परिषद: दिलीप बोरलकर यांची माहिती
चंद्रपूर : चंद्रपूरचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा तयार केला. मात्र विकासाची गती आणि प्रदूषण नियंत्रणासाठी लागणारे इम्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील वाढत जाणारी तफावत दूर करता आली नाही. शिवाय कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्नही तोकडे पडले. यामुळे चंद्रपूर प्रदूषणमुक्त होऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सचिव डॉ. दिलीप बोरलकर यांनी केले.
डॉ. बोरलकर हे एका कार्यक्रमासाठी आज गुरुवारी चंद्रपूरला आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. बोरलकर पुढे म्हणाले, एखादी समस्या निर्माण झाली की एकत्र येऊन त्याचा अभ्यास केला जातो. त्याचे सर्वेक्षण केले जाते. एक फाईल तयार होते. मात्र हा अहवाल मंत्रालयात पडून राहतो. प्रदूषणाची समस्या मोठी आहे. याचे दुष्परिणाम दुरगामी आहेत. त्यामुळे केंद्र, राज्य शासनाच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचार्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी अतिशय जलद गतीने प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. हैदराबादला चार हजार टन घनकचर्याची व्यवस्थित विल्हेवाट होते. मग चंद्रपुरात १३0 टन घनकचर्याची विल्हेवाट का होऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनीच उपस्थित केला. प्लॅस्टिकचे प्रदूषण वाढत आहे. ही बाब धोकादायक आहे. प्लॅस्टिक निर्मुलनाची आज निकडीची गरज आहे. ५0 मायक्रॉनपेक्षा कमी प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे. मात्र दुर्दैवाने ही बंदी पाळली जात नाही. या पिशव्या गोळा करणार्यांना विशेष आर्थिक फायदा होत नाही. त्यामुळे कुणीही त्या गोळा करीत नाही. पत्रकार परिषदेला आयएमएचे राज उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस, ग्रीन प्लॅनेटचे सुरेश चोपणे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)