‘स्वच्छता अॅप’मध्ये चंद्रपूरने राज्यात मारली पहिल्या क्रमांकावर बाजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:11 AM2017-11-22T11:11:36+5:302017-11-22T11:14:16+5:30
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यात चंद्रपूर शहराने राज्यात प्रथम स्थान तर पटकावले आहेच शिवाय देशातही १७० व्या क्रमांकावरुन थेट २८ व्या स्थानी उडी घेतली आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यात चंद्रपूर शहराने राज्यात प्रथम स्थान तर पटकावले आहेच शिवाय देशातही १७० व्या क्रमांकावरुन थेट २८ व्या स्थानी उडी घेतली आहे. चंद्रपूर शहरातील जवळपास ५ हजार ८३४ मोबाईलधारकांनी ‘स्वच्छता अॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे.
२ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली. स्वच्छता मोहिमेत केवळ सरकारी कर्मचाऱ्यांवर भर न देता समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिकांनी भर द्यावा, यासाठी जनजागृती करण्यात आली.
स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी सहजरीत्या नोंदविता याव्या, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून स्वच्छता अॅपची सुरुवात करण्यात आली. यात देशभरातील विविध शहरे आपला सहभाग नोंदवितात. सहभागी शहरांच्या स्वच्छतेविषयक कामगिरीचे क्वालिटि कौन्सिल आॅफ इंडिया या संस्थेद्वारे सर्वेक्षण केले जाते. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत देशभरातील ४ हजार ४१ शहरे सहभागी आहेत. स्वच्छता गुणवत्तेविषयक विविध निकष सहभागी शहरांना पार पाडायचे आहेत.
यातीलच एक म्हणजे, शहरातील किती लोकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केले, किती लोकांनी कचऱ्यासंबंधी तक्रारी नोंदविल्या, त्या किती वेळेत सोडविण्यात आल्या व तक्रारी निवारणाबाबत नागरिकांचा अभिप्राय काय, हे सर्व स्वच्छता अॅपवर दिसत असते. सामान्य नागरिकांना आपला परिसर व पर्यायाने शहर स्वच्छ ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे स्वच्छता अॅपवर तक्रार करणे.
शहरातील कुठल्याही भागात कचरा दिसल्यास नागरिक तक्रार करू शकतात. या कचºयाचा फोटो काढून स्वच्छता अॅपवर टाकल्यास महानगरपालिकेद्वारे १२ तासांच्या आत त्यावर कार्यवाही करण्यात येते. तक्रार निवारण केल्यावर त्यावर अभिप्राय नोंदविणे गरजेचे आहे. या तक्रारींचे निवारण योग्यरित्या झाले नसल्यास नागरिक नकारात्मक अभिप्राय नोंदवू शकतात किंवा पुन्हा ती तक्रार उघडू शकतात. जेणेकरुन त्या तक्रारींचे पूर्णत: निवारण करणे महानगरपालिकेला आवश्यक आहे.
सुमारे १० हजार नागरिकांनी अॅप डाऊनलोड करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेचे ध्येय आहे. आयुक्त संजय काकडे यांच्या निर्देशानुसार मनपाचा स्वच्छता विभाग यासाठी सतत कार्यरत आहे. सुमारे २०० अॅप्स रोज डाऊनलोड केले जात असून यात दररोज सुमारे ४०० तक्रारी व त्यांचे निवारण तसेच ३०० पेक्षा जास्त अभिप्राय नागरिक नोंदवित आहेत. या एक महिन्याच्या कालावधीत पाच हजार ८३४ अॅप नागरिकांनी डाऊनलोड केलेल्या आहेत.