सांगली-कोल्हापुरातील पुरग्रस्तांना चंद्रपुरातून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:45 AM2019-08-14T00:45:11+5:302019-08-14T00:45:49+5:30
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले. १५ आॅगस्टला दोन्ही जिल्ह्यातील आपादग्रस्तांना साहित्य वितरण केल्या जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अन्नधान्य, कपडे व घरातील जीवनोपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे राज्यभरातून सर्वत्र मदतीचा ओघ सुरू आहे. विदर्भ किसान मजदूर कांँग्रेसच्या सर्व युनियन तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जैन समाजाच्या वतीने पाच किलो तांदूळ, पाच किलो आटा, दोन किलो तूर डाळ, १ लिटर तेल, २ किलो साखर, तिखट, मीठ, हळद, जीरे, मेणबत्त्या, माचिस याससह सोलापूरी चादर व एक ब्लँकेट आदी साहित्याच्या ७५० किट्स तयार करण्यात आल्या. हे साहित्य १३ आॅगस्ट २०१९ रोजी रवाना करण्यात आले. दरम्यान, तेथील जिल्हा प्रशासनाच्या वतीने ज्या ठिकाणी हे साहित्य वितरण करण्यासाठी नगरसेवक अशोक नागापुरे व देवेंद्र बेले यांच्यासह कामगार संघटनेचे एक पथक १५ आॅगस्ट २०१९ रोजी साहित्य वितरण करणार आहे, अशी माहिती माजी खासदार पुगलिया यांनी दिली. पत्रकार परिषदेला विदर्भ किसान मजदूर काँग्रेस युनियनचे पदाधिकारी, काँग्रेस व जैन समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मदत करण्याचे आवाहन
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपाद्ग्रस्त नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन सेवा समितीच्या वतीने साहित्य पाठविण्यात आले. जिल्ह्यातील अन्य सामाजिक संस्था व संघटनांनीही मदत करावी, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी यावेळी केले.