शहिदांच्या सन्मानासाठी बंद राहिले चंद्रपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:36 PM2019-02-18T22:36:31+5:302019-02-18T22:38:25+5:30
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांच्या सन्मानार्थ व घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्स व व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या चंद्रपूर बंदला सोमवारी शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील संपूर्ण दुकाने कडकडीत बंद होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांच्या सन्मानार्थ व घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्स व व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या चंद्रपूर बंदला सोमवारी शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील संपूर्ण दुकाने कडकडीत बंद होती.
यात शहरातील ३० व्यापारी संघटनांचा सहभाग होता. बंददरम्यान व्यापाºयांनी बाईक रॅली काढून जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविले.
पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर चेंबर आॅफ कॉमर्सने एक तातडीची बैठक घेतली. यात कॅन्डल मार्च काढणे, व्यापारपेठ बंद ठेवणे व निधी गोळा करून शहिदांच्या कुटुंबीयांना देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यानुसार रविवारी सायंकाळी ६ वाजता सर्व व्यापारी गांधी चौकात एकत्रित आले.
त्यानंतर तिथून कॅन्डल मार्च काढण्यात आला. हा कॅन्डल मार्च जटपुरा गेटजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आला व तिथे शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कॅन्डल मार्चमध्ये शहरातील शेकडो नागरिकही सहभागी झाले होते.
त्यानंतर सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सकाळपासूनच एक-दोन किरकोळ दुकानांचा अपवाद वगळता चंद्रपुरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बंगाली कॅम्प, गिरनार चौक, गांधी चौक, रामनगर, बाबुपेठ, बागला चौक, पठाणपुरा आदी परिसरातील बाजारपेठा बंद होत्या. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद यशस्वी करीत शहिदांना श्रध्दांजली अर्पित केली. यावेळी नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने उपस्थिती दर्शविली.
बाईक रॅली
सकाळपासून व्यापारपेठ बंद ठेवल्यानंतर व्यापाऱ्यांनी गांधी चौकातून बाईक रॅली काढली. गांधी चौक ते जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट व जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही बाईक रॅली फिरली. दरम्यान, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात येत होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन पाठविण्यात आले. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, विनोद बजाज, रामजीवन परमार, सुमेध कोतपल्लीवार, दिनेश बजाज, अविनाश बुक्कावार, विवेक पत्तीवार, चंद्रकांत उमाटे, रितेश वर्मा, सुनील शुक्ला, चिंटू पुगलिया आदी उपस्थित होते.
बाजारपेठेत शुकशुकाट
या बंददरम्यान, मुख्य रस्त्यावरील दुकानांसह गल्लीबोळातील लहान-सहान दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. चहा टपरी, पान टपऱ्यादेखील बंद होत्या. एरवी चंद्रपुरातील गंजवॉर्ड, गोकूल गल्ली, गोलबाजार, गांधी चौक या ठिकाणी बाजारपेठत रेलचेल असते. मात्र सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असतानाही बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.
नागभीडमध्ये कडकडीत बंद
नागभीड : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा नागभीड येथे कडकडीत बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला. नागभीड येथील सर्व राजकीय पक्ष, संस्था एकत्रित आले. व्यापाºयांनीही आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. नगर परिषदेच्या ओट्यापासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत सर्वच विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.