Chandrapur: पंधरवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात दुसरा गोळीबार; तरुणाचा जागीच मृत्यू, राजुरा हादरला
By परिमल डोहणे | Published: July 23, 2024 09:52 PM2024-07-23T21:52:57+5:302024-07-23T21:53:40+5:30
Chandrapur Crime News: मागील पंधरवड्यापूर्वी चंद्रपुरात गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. २३ रोजी) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजुऱ्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला.
- परिमल डोहणे
चंद्रपूर - मागील पंधरवड्यापूर्वी चंद्रपुरात गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. २३ रोजी) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजुऱ्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. जीव वाचवण्याच्या आकांताने तो तरुणजवळील एका दुकानातील स्वच्छतागृहात शिरला. मात्र ते दोन नकाबधारी स्वच्छतागृहात जाऊन पुन्हा गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शिवज्योतसिंग देवल (२८, रा. राजुरा) असे मृतकाचे नाव आहे. सततच्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हाच हादरून गेला आहे.
शिवज्योतसिंग देवल हा ट्रकचालक होता. तो अत्यंत साधा व भजन कीर्तन करणारा तरुण म्हणून गावात प्रसिद्ध होता. मंगळवारी सात वाजताच्या सुमारास तो आपल्या वडिलांना भेटून कर्नल चौकाकडून बसस्थानक चौकाकडे येत होता. दरम्यान, बॅंक ऑफ महाराष्ट्रजवळ पोहोचताच त्याच्या मागावर असलेल्या दुचाकीवरील दोन नकाबधारी इसमानी बेधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक गोळीबार झाल्याने भांबावलेल्या अवस्थेत शिवज्योतसिंगजवळील एका दुकानातील स्वच्छतागृहात शिरला. मात्र ते नकाबधारी त्याच्या मागोमाग त्या दुकानातील स्वच्छतागृहात जाऊन त्याचा जीव जाईपर्यंत गोळ्या झाडल्या अन् लगेच दुचाकीने पसार झाला. घटनेची माहिती होताच घटनास्थळावर बघ्याची मोठी गर्दी जमली. दरम्यान, राजुराचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच शहराबाहेर जाणारे सर्व रस्त बंद केले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
वर्षभरापूर्वीच्या गोळीबाराची पार्श्वभूमी
२४ जुलै २०२३ रोजी राजुऱ्यातील सोमनाथपूर येथे एका कोळसा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला होता. यात पूर्वा डोहे नामक विवाहित महिलेचा नाहक बळी गेला होता. या प्रकरणात शिवज्योतसिंग देवल याचा भाऊ नवज्योतसिंग देवल याला पोलिसांनी अटक केली होती. सद्य:स्थितीत नवज्योतसिंग देवल हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच प्रकरणातून हा गोळीबार तर झाला नसावा, असा संशय व्यक्त होत आहे.
आठ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
शिवज्योतसिंगचे देवल हा अत्यंत साध्या राहणीमान असलेला तरुण होता. मागील आठ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. सुखी आनंदाने जगत असतानाच त्यांच्या गोळीबारने मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोळ्या संपल्यानंतर पुन्हा गोळ्या भरल्या
शिवज्योतसिंगवर गोळी झाडल्यानंतर तो एका दुकानातील स्वच्छतागृहात गेला. त्याच्या मागेच दोघे नकाबधारी त्या स्वच्छतागृहात गेले. अन् पुन्हा बेछूट गोळ्या झाडल्या. गोळ्या संपल्यानंतर त्यांनी पुन्हा बंदुकीमध्ये गोळ्या भरल्या आणि पुन्हा गोळ्या झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र नेमक्या किती गोळ्या झाडल्या हे कळू शकले नाही.