जिल्ह्यात चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर
By admin | Published: November 27, 2014 11:30 PM2014-11-27T23:30:38+5:302014-11-27T23:30:38+5:30
महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून अशिक्षित असणाऱ्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करते. असे असतानाही चंद्रपूर जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब एका माहितीवरुन
चंद्रपूर : महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून अशिक्षित असणाऱ्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करते. असे असतानाही चंद्रपूर जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब एका माहितीवरुन समोर आली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यापैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर असला तरी टक्केवारी बघता फक्त ८७.५ आहे. साक्षरतेचे सर्वाधिक कमी प्रमाण अतिदुर्गम समजल्या जाणारा जिवती तालुक्यात आहे.
जिवती तालुक्यात ७५.५ टक्के लोक साक्षर असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात निरंतर शिक्षण विभागाचे स्वतंत्र कार्यालय असतानासुद्धा चंद्रपूर जिल्हा साक्षरतेमध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून येते.
अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निरंतर शिक्षणाचे कार्यालय जिल्ह्यात उघडून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रुपये आतापर्यंत खर्च केले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा साक्षरतेने परिपूर्ण व्हायला पाहिजे होता. मात्र जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा संवेदनशिल नसल्याची बाब समोर आली आहे. आजच्या स्थितीत १४ तालुक्यामध्ये वरोरा ८४, चिमूर ७७.४, नागभीड ७६.५, ब्रह्मपुरी ७८, सावली ७०.१, सिंदेवाही ७६.८, भद्रावती ८४.२, चंद्रपूर ८७.५, मूल ७१.८, पोंभूर्णा ७०.५, बल्लारपूरर ८४.४, कोरपना ८१.१, राजुरा ७८.९, गोंडपिंपरी ७२, जिवती ६५.५ एवढी टक्केवारी साक्षरतेची आहे.
विशेष म्हणजे, साक्षरतेमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त प्रमाणात आहे. जिवती तालुक्यात ५५.२ टक्के स्त्रिया साक्षर असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात ८६.८ पुरुष साक्षर असून ७३.० स्त्रिया साक्षर आहेत.
ग्रामीण भागात ८३.७ टक्के पुरुष तर शहरी भागात ६७.१ टक्के स्त्रिया साक्षर आहेत. शहरी भागात पुरुष ९२.२ टक्के तर ८३.७ स्त्रिया साक्षर आहेत. साक्षरता अभियान अनेक वर्षांपासून राबवूनसुद्धा साक्षरता अभियानाचे फलीत झाले नसल्याचे दिसून येते. पुन्हा एकदा शासनाला साक्षरता अभियान राबवावे लागणार असे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)