चंद्रपूर : आकाशातून कोसळलेले ‘ते’ तुकडे चिनी उपग्रहाचे, अखेर इस्त्रोचे शिक्कामोर्तब
By राजेश मडावी | Published: April 5, 2023 02:37 PM2023-04-05T14:37:20+5:302023-04-05T14:38:09+5:30
केंद्र सरकारकडे सादर केला अहवाल.
चंद्रपूर : वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी परिसर व विविध वेगवेगळ्या ठिकाणी अवकाशातून कोसळलेले रिंग व सिलिंडर हे चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईटचे तुकडे असल्याचे इस्त्रो व अमेरिकेच्या चंद्रा ऑब्जवेर्टी या संस्थेने शिक्कामोर्तब केले. इस्त्रोने या बाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे सोपविला आहे. २ एप्रिल २०२२ रोजी उघडकीस आलेल्या या घटनेला एक वर्षाचा कालावधी झाला आहे.
राज्याच्या विविध भागात आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात २ एप्रिल २०२२ रोजी रात्री ८. ३० वाजता च्या सुमारास एक मोठी रिंग व फुटबॉलच्या आकाराचा सिलिंडर अवकाशातून कोसळला होता. या घटनेला अनेकांनी कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केल्याने मोठी चर्चा झाली होती. लाडबोरी येथे रिंग व सिलेंडर कोसळल्याची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच त्यांनी गावात जावून घटनेची पहाणी करून अवकाशातून कोसळलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या.
पोलीस ठाण्यात त्याच रात्री जमा करण्यात आल्या. त्यानंतर त्याच रात्री कोसळलेले फुटबॉलच्या आकाराचे साहित्य ब्रम्हपूरी, चिमूर व सिंदेवाहीच्या अनेक भागात आढळून आले. त्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. या घटनेची दहशत निर्माण झाल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व स्कायवॉच गृपचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी इस्त्रोकडे या बाबत चौकशीची मागणी केली होती. १५ एप्रिल २०२२ रोजी इस्त्रोचे दोन वैज्ञानिक एम. शहाजहान, मयूरेश शेट्टी व स्कॉयवॉच गृपचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी लाडबोरी गावाची पाहणी व नागरिकांशी चर्चा केली. सिंदेवाही पोलीस ठाण्यात ठेवलेल्या त्या वस्तूंचे निरीक्षण करून त्या अवकाशी वस्तू निरीक्षणाकरता पाठविण्यात आल्या होत्या.
काय आहे निष्कर्ष ?
इस्त्रोने त्या अवकाशीय वस्तूंचे निरीक्षण केले असता चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईचे ते तुकडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. चीन देशाने लाँगमार्च हा उपग्रह अवकाशात सोडला होता. हा उपग्रह बंगालच्या खाडीत पडणे अपेक्षित होते. परंतु उपग्रहाचे तुकडे समुद्रात न पडता विविध देशांसह महाराष्ट्रातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागात कोसळले.
नासाची एक संस्था असलेल्या ऑब्जवेर्टी संस्थेचे शास्त्रज्ञ जॉन्सॉन मॅक्डेएल यांनी व इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, चंद्रपूर व अन्य ठिकाणी कोसळलेल्या अवकाशीय वस्तू चीनच्या लाँगमार्च उपग्रहाचेच तुकडे आहेत. याबाबत जॉन्सॉन मॅक्डेएल यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे भारत सरकार भविष्यात या घटनेबाबत कार्यवाही करते, याकडे लक्ष आहे.
प्रा. सुरेश चोपणे,
खगोल अभ्यासक स्कायवॉच गृप, चंद्रपूर