चंद्रपूर : नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक व टँकर चालक रस्त्यावर
By राजेश मडावी | Published: January 10, 2024 04:04 PM2024-01-10T16:04:26+5:302024-01-10T16:04:54+5:30
‘स्टिअरिंग छोडो’ आंदोलन : संतप्त चालकांकडून ‘केंद्र सरकार विरोधात घोषणा
चंद्रपूर : नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारचे चारचाकी वाहन व पेट्रोल-डिझेल टँकरचालकांनी बुधवारी (दि. १०) रस्त्यावर उतरून ‘स्टिअरिंग छोडो’ आंदोलन केले. आंदोलनाची सुरुवात वरोरा नाका चौकातून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी संतप्त चालकांनी ‘केंद्र सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊन नवीन कायदा रद्द करण्याची मागणी केली.
मागील आठवड्यात ट्रकचालक आणि पेट्रोल-डिझेल टँकरचालकांनी संपाची हाक दिली होती. त्याचेही पडसाद चंद्रपूर जिल्ह्यावर उमटले होते. नवीन वाहन कायद्याला विरोध करीत ट्रकचालकांनी संपात सहभागी होऊन केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला होता; परंतु बुधवारी पुन्हा एकदा ट्रकचालक आणि पेट्रोल-डिझेल टँकरचालकांनी ‘स्टिअरिंग छोडो’ आंदोलन करून नवीन कायद्याला कडाडून विरोध केल्याचे आज दिसून आले. विशेष म्हणजे पेट्रोल-डिझेल टँकरचालक देखील या संपात सहभागी झाले होते.
चालकांची मुख्य मागणी काय?
केंद्र सरकारने रस्ते अपघात आणि हिट ॲण्ड रन प्रकरणांत वाढ झाल्याने सरकारने नवीन कायदा पारित केला. या कायद्याला ट्रकचालक व बसचालकांचा विरोध आहे. चालकांच्या हातून अपघात घडून त्यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांना सरळ १० वर्षांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावण्याची या कायद्यात तरतूद आहे. यापूर्वी, आयपीसी कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत आरोपीला फक्त २ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होता. नवीन कायद्यामुळे चालक आपले काम करण्यास तयार होणार नाहीत. नवीन कोणी चालक म्हणून नोकरी करणार नसल्याचा आरोप चालकांनी केला आहे.