Chandrapur: प्रसुतीसाठी जाणाऱ्या दोन महिलांना पुरातून मोकळी करुन दिली वाट
By परिमल डोहणे | Published: July 26, 2024 08:23 PM2024-07-26T20:23:48+5:302024-07-26T20:24:07+5:30
Chandrapur Flood News: कर्मचाऱ्यांनी धो-धो पावसात शर्थीचे प्रयत्न करुन चक्क पुरातून मार्ग काढत दोन्ही महिलांना प्रसुतीसाठी सुखरुप गडचिरोली महिला रुग्णालयात पोहोचवले.
- परिमल डोहणे
चंद्रपूर - बाहेर धो-धो पडणारा पाऊस. सर्वच नद्या नाल्यांना पूर. अन् याच दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती असणाऱ्या दोन गर्भवती महिलांना प्रसुतीमध्ये धोका निर्माण झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात लवकर भरती करण्याचा डॉक्टरांचा सल्ला दिला होता. काय करावे पुरातून मार्ग कसा काढायचा याबाबत कुणालाच काही कळेना. याबाबतची माहिती सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून कळताच त्यांनी तालुका महसूल मंडळ, पाथरीचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना सूचना देऊन उपाययोजना करण्याचे सांगितले. त्या कर्मचाऱ्यांनी धो-धो पावसात शर्थीचे प्रयत्न करुन चक्क पुरातून मार्ग काढत दोन्ही महिलांना प्रसुतीसाठी सुखरुप गडचिरोली महिला रुग्णालयात पोहोचवले.
मागील तीन दिवसांपासून सावली तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व छोट्या-मोठ्या नद्या नाले तुडूंब भरले आहेत. काहींना तर पूर आला असून मार्गही बंद आहेत. अशातच २५ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता पाथरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरतील असलेल्या दोन गर्भवती महिलांमध्ये लेबर पेन सुरु झाले. यातच दोघांच्या प्रसुतीमध्ये हाय रिस्क असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करणे गरजेचे होते. ही बाब आरोग्य अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच पाथरीचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना कळविले.
दरम्यान तहसीलदार प्रांजली चिरडे यांनासुद्धा पूरपरिस्थितीचा आढावा घेताना ही बाब माहिती झाली. त्यांनी सर्व आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभागांना सूचना देऊन उपाययोजना करत त्या दोन्ही महिलांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सुचना दिल्या. मात्र सर्वत्र पुरपरिस्थिती असल्याने व त्या भागातील सर्व पुल नाले भरुन वाहत असल्याने रुग्नवाहिका कोणत्या मार्गाने न्यावी याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला. दरम्यान सकाळी ५.१५ वाजता रुग्णवाहिका पाथरी मेहाबुज, अंतरगाव, निमगाव, चक विरखल, थेरगाव, व्याहाड या मार्गाने नेण्याचे ठरविण्यात आले. या मार्गामध्ये अंतरगाव ते निमगाव व चकविरखल ते थेरगाव पुलावर अंदाजे एक ते दीड फुट पाणी वाहत होते. अशाही स्थितीत नैसर्गिक आपत्तीचे नोडल अधिकारी अनमोल कांबळे, पाथरीचे तलाठी इम्रान पठाण, तलाठी पालेबारसा मडावी, कोतवाल व आपदा मित्रांनी शर्थीचे प्रयत्न करुन व्याहाड गडचिरोली मार्गावर सकाळी ६.१५ वाजता रुग्णवाहिका आणून गडचिरोलीकरिता रवाना करण्यात आली. त्यामुळे दोन्ही महिलांना वेळेत रुग्णालयात सुखरुप भरती करण्यात आले.