चंद्रपुरातील पाणी पुरवठा पुन्हा अनियमित
By admin | Published: February 23, 2016 12:40 AM2016-02-23T00:40:14+5:302016-02-23T00:40:14+5:30
मागील काही महिन्यांपासून चंद्रपुरातील पाणी पुरवठा नागरिकांचा संताप अनावर करणारा ठरत आहे.
पाण्याअभावी हाल : अनेक वॉर्डात नळाला पाणीच नाही
चंद्रपूर : मागील काही महिन्यांपासून चंद्रपुरातील पाणी पुरवठा नागरिकांचा संताप अनावर करणारा ठरत आहे. याबाबत नागरिकांनी ओरड केल्यानंतर मनपानेही कोलमडलेल्या पाणी पुरवठ्याबाबत ‘अॅक्शन’ घेत संबंधित कंपनीला तंबी दिली. त्यानंतर काही दिवस पाणी पुरवठा ठिक सुरू होता. आता पुन्हा यात अनियमितता येत असल्याने नागरिकांची ओरड सुरू झाली आहे.
चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले.
पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्यात बराच अनियमितपणा येऊ लागला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. पाईप लाईन जुनी व खिळखिळी असल्याने अनेक ठिकाणी पाईप लाईन लिकेज होऊन काही भागाचा पाणी पुरवठा प्रभावित होतो. असा प्रकार अनेकवेळा घडत असल्याने संबंधित कंपनीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील एक-दोन वॉर्ड सोडले तर जवळजवळ सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत होता. हॉस्पीटल वार्ड, सिव्हील लाईन, रामनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, भानापेठ वार्ड, बालाजी वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, जीवन ज्योती कॉलनी, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात अतिशय कमी पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांनी चांगलीच ओरड केली होती. त्यानंतर याबाबत महानगरपालिकेच्या आमसभेत चांगलाच गदारोळ करण्यात आला. बहुतांश नगरसेवक पाणी पुरवठ्याबाबत आग्रही असल्याने आयुक्त सुधीर शंभरकर यांनी सदर कंपनीला एक पत्र पाठवून तंबी दिली. त्यानंतरही सुधारणा झाली नाही. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारत पाणी पट्टी कर आपल्या हातात घेणे सुरू केले आहे. या कारवाईनंतर पाणी पुरवठा काही दिवस सुरळीत सुरू राहिला.
आता मात्र पुन्हा काही वॉर्डात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. कधीच अनेक भागात नळच येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी नळ येतो पण अतिशय लहान धार असते. त्यामुळे पाणीच मिळत नाही. काही वॉर्डात पुन्हा नळ येण्याची नियोजित वेळ बदलविण्यात आल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)