चंद्रपूरच्या पाणीपुरवठयात ५० टक्के कपात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:36 PM2017-08-25T23:36:45+5:302017-08-25T23:37:06+5:30
चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाण्याचा साठा चिंताजनक असल्याने ......
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाण्याचा साठा चिंताजनक असल्याने १ सप्टेंबरपासून शहरातील पाणीपुरवठा ५० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने गुरूवारी घेतला. जिल्हाधिकाºयांनी संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक घेतल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने गुरूवारी इरई धरणाची पाहणी केली आणि पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षीची पाणीटंचाई सन २०१० पेक्षाही भीषण असण्याची स्थिती दिसत आहे. सुरूवातीलपासूनच पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाणीसाठा चिंताजनक आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी धरणातील पाणीसाठा २०६.७०० मीटर होता. यावर्षी आजच्या तारखेत २०३.९०० मीटर पाणीसाठा आहे. वीज केंद्रातील सर्व संच नियमित सुरू ठेवले तसेच नियमित पाणीपुरवठा सुरू राहिल्यास आजपासून पुढील केवळ चार महिनेपाणी मिळेल, अशी स्थिती आहे. चंद्रपूर शहराला महिन्याकाठी १ एमएम क्यूब आणि चंद्रपूर वीज केंद्रात प्रत्येक महिन्याला ९ एमएम क्यूब पाण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर शहर आणि वीज केंद्राला दर महिन्याला साधारणत: १० एमएम क्यूब पाण्याची गरज पाहता पाच महिन्यानंतर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. चालू वर्षातील पावसाळ्याचे बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पावसाची अपेक्षा आता सर्वांनीच सोडली आहे.
भीषण पाणीटंचाईची स्थिती पाहता जिल्हाधिकाºयांनी गेल्या आठवड्यात पाणीटंचाई संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीतसुध्दा पाणीटंचाईवर चिंता व्यक्त करण्यात आली. शहराला पाणीपुरवठा होईल, यासाठी इरई धरणाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही स्त्रोत नाही. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता अनिल घुमडे, पाणीपुरवठा अभियंता विजय बोरीकर आदींनी गुरूवारी इरई धरणाची पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणीत पाणीसाठ्याची स्थिती भीषण दिसून आल्याने १ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. मनपातील पाणीपुरवठा विभाग तसेच पाणीपुरवठा करणाºया उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान १ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई संदर्भात बैठक होणार असून त्यात जिल्हा प्रशासन सीटीपीएसमधील संच सुरू ठेवण्याबाबत काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. या बैठकीच्या अनुषंगाने मनपा प्रशासन पाणीटंचाईबाबत नियोजन आरखडा तयार करणार आहे.
शहरातील सार्वजनिक विहिरी, हातपंपाची दुरूस्ती करून त्याद्वारे पाण्याचा नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.