Chandrapur: पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव तरतूद करणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

By राजेश मडावी | Published: January 6, 2024 06:43 PM2024-01-06T18:43:09+5:302024-01-06T18:45:20+5:30

Chandrapur News: आगामी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासुद्धा हा आकडा 500 कोटींच्या वर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करू, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Chandrapur: Will make substantial provision for infrastructure development, says Guardian Minister Sudhir Mungantiwar | Chandrapur: पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव तरतूद करणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

Chandrapur: पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव तरतूद करणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

- राजेश मडावी
चंद्रपूर - सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात शासनाने जिल्ह्यासाठी २६० कोटींचा नियतव्यय मंजूर केला असताना ३८० कोटी रुपये मंजूर करून आणण्यात यश आले. आगामी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासुद्धा हा आकडा 500 कोटींच्या वर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करू, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नियोजन सभागृह येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. 

बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., जिल्हा नियोजन अधिकारी राजेश कळमकर यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, सन २०२३-२४ साठी शासनाच्या मंजूर नियतव्ययापेक्षा तब्बल १२० कोटींची वाढ जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात आली.  आगामी आर्थिक वर्षासाठी (सन २०२४-२५) जिल्ह्याला वाढीव निधी मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये चर्चा करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणेकडून तब्बल ८१९ कोटी ८६ लाखांची मागणी नियोजन समितीकडे प्राप्त झाली आहे. या मागणीला अनुसरून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी ५१७ कोटी ८६ लाखांचा निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यात शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, रोजगार या पंचसुत्रीवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
नवीन अंगणवाडी बांधकामाचा विषय अतिशय गांभिर्याने घेण्याची गरज असून यासाठी चांगले डिझाईन तयार करावे. अंगणवाडीमध्ये सर्व संगणकीय व्यवस्था, मॉनेटरिंग सिस्टीम, बांधकामाचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे. सोबतच शौचालय, स्वच्छता गृह, भोजनकक्ष, संरक्षण भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याकडे विशेष लक्ष द्यावे.

क्रीडांगण विकासासंदर्भात ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवावेत. प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक जीम तयार करून तेथे महिला आणि पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करावी. सदर काम सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी क्रीडा विभागाने लक्ष द्यावे. सोबतच वरोरा स्टेडीयमचे नुतणीकरण आणि चंद्रपूरचे तालुका स्टेडीयम घुग्घुसमध्ये करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्‍य योजना, आयुष्मान भारत योजना व इतर आरोग्यविषयक योजनांची माहिती होण्यासाठी फलक लावावा, अशा सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राजेश कळमकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

सीसीटीव्हीबाबत पोलिस विभागाचा स्वतंत्र प्लान
जिल्ह्यात सीसीटीव्ही बाबत पोलिस विभागाने चंद्रपूरचा स्वतंत्र प्लान तयार करावा. तसेच पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, नाईट व्हिजन कॅमेरा यासंदर्भात सुक्ष्म आराखडा तयार करावा. नवीन पोलिस स्टेशन, स्मार्ट सिग्नल याबाबत ‍नियमित पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील खुल्या सार्वजनिक जागांचे संरक्षण करणे अतिशय महत्वाचे असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व खुल्या जमिनीभोवती संरक्षण भिंत बांधावी. त्यासाठी नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

Web Title: Chandrapur: Will make substantial provision for infrastructure development, says Guardian Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.