विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘मिशन गरुड झेप’, चंद्रपूर जिल्हा परिषदेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 12:05 PM2022-02-23T12:05:01+5:302022-02-23T12:11:42+5:30
‘मिशन गरुड झेड’अंतर्गत लहान वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती करून दिल्या जात आहे.
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून काही दिवस सोडले तर शाळा बंदच होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने ‘मिशन गरुडझेड’ हा ४५ दिवसांचा विशेष उपक्रम सुरू केला आहे. राज्यात असा उपक्रम सुरु करणारी चंद्रपूर जिल्हा परिषद एकमेव आहे.
‘मिशन गरुड झेप’अंतर्गत विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करण्यात आला आहे. यासाठी प्रथम विद्यार्थ्यांची एक चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे, मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांवर अतिरिक्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ डाॅ. मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चाफले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम जिल्ह्यात राबविणे सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, मार्गदर्शनासाठी जिल्ह्यात ६० शिक्षकांचा सुपर गट तसेच प्रत्येक तालुक्यात २० शिक्षकांचा एक गट तयार करण्यात आला आहे. चाचणीमध्ये जे विद्यार्थी मागे पडल्याचे दिसून आले अशा विद्यार्थ्यांना शिक्षक दररोज सुरुवातीचा दीड तास शिकविणार आहे. यासाठी शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, नृत्य, गायन याकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे.या उपक्रमांतर्गत पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून शाळांतील भौतिक सुविधांकडेही विशेष लक्ष पुरविले जाणार आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थी कुठेच मागे पडू नये यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून त्यानुसार त्यांचा स्तर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेसाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गावागावात यासाठी वाचनालयही उभारण्यात येणार आहे.
-डाॅ. मिताली सेठी, सीईओ, चंद्रपूर
स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन
‘मिशन गरुड झेड’अंतर्गत लहान वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती करून दिल्या जात आहे. विशेष म्हणजे, शिष्यवृत्ती परीक्षेबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. यासोबतच गायन, वक्तृत्व, नृत्य यावरही विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार सराव करून घेण्यात येत आहे.