कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चंद्रपूरकर वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 06:00 AM2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:15+5:30

उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे कंत्राट गेल्यापासून शहरातील पाणी पुरवठा अनियमित झाला आहे. इरई धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असतानासुद्धा शहरातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही. ज्या भागात सुस्थितीत पाणी पुरवठ्याची लाईन आहे, तिथेही नियमित पाणी पुरवठा होत नाही.

Chandrapurkar approached due to contractor's enthusiasm | कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चंद्रपूरकर वेठीस

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चंद्रपूरकर वेठीस

googlenewsNext
ठळक मुद्देअखेर मनपाने भरले देयक : थकीत वीज बिलामुळे पाणी पुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या पाणीपुरवठ्याचे कंत्राट असलेल्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने मागील तीन महिन्यांपासूनचे सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचे वीज बिल विहीत मुदतीत भरले नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने बुधवारी दुपारी इरई धरणावरील पाणीपुरवठ्याची वीज खंडित केली. परिणाम गुरुवारी संपूर्ण चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे धरणात मुबलक पाणी असतानाही पाण्यासाठी भटकंती करावी लागली.
विशेष म्हणजे, वीज बिल जोपर्यंत अदा केले जाणार नाही, तोपर्यंत पंपहाऊसचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला जाणार नाही, अशी भूमिका वीज वितरण कंपनीने घेतली. त्यामुळे चंद्रपूरकरांना आणखी किती दिवस पाणी मिळणार नाही, हे सांगणे कठीण झाले होते. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अखेर महानगरपालिकेनेच गुरुवारी दुपारी थकित वीज बिलाचा भरणा केल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे कंत्राट गेल्यापासून शहरातील पाणी पुरवठा अनियमित झाला आहे. इरई धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असतानासुद्धा शहरातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही. ज्या भागात सुस्थितीत पाणी पुरवठ्याची लाईन आहे, तिथेही नियमित पाणी पुरवठा होत नाही. वीजबिल अधिक भरावे लागू नये म्हणून कंत्राटदाराकडून इरई धरणावरील पंप नियमित सुरु केला जात नाही. पाण्याची उचलच कमी केली जाते. त्यामुळे पाणीपुरवठा होत नाही. या प्रकारामुळे चंद्रपूर मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठ्याबाबत त्रस्त आहेत.
आता तर कंत्राटदाराने हद्दच केली आहे. मागील तीन महिन्यांपासून इरई धरणावरील पंपहाऊसचे वीज बिल थकित ठेवले. थकित बिलाची रक्कम आता १ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे. तीन महिन्यांचे वीज बिल थकीत असल्यामुळे प्रकरण अंगलट येणार, असे दिसताच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या आदल्या दिवशी वीज कापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ऐन दिवाळीत नागरिकांना पाणी मिळाले नाही तर प्रचंड रोष निर्माण होईल. त्यामुळे वीज खंडित करण्यात येवू नये, अशी विंनती महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे वीज कापण्यात आली नव्हती. दिवाळी संपून आठवडा होताच वीज बिल भरण्यात न आल्यामुळे अखेर वीज वितरण कंपनीने बुधवारी दुपारी इरई धरणावरील पंपहाऊसचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाºया टाक्या भरू शकल्या नाही. त्यामुळे गुरुवारी शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चंद्रपूरकरांना गरज नसताना गुरुवारी दिवसभर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागली.
विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून चंद्रपुरातील अनेक भागात दूषित व गढूळ पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी झाल्यानंतरही कंत्राटदार याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

आता महापालिका करणार पैसे वसूल
कंत्राटदाराने एक कोटी ६० लाखांचे थकित वीज तत्काळ भरावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विनंती केली. प्रसंगी दबावही टाकला. मात्र कंत्राटदार योगेश समरित वीज बील भरण्यास तयार झाले नाही. त्यामुळे आता अनिश्चित काळासाठी शहरात पाणी पुरवठा होणार नाही, असे दिसू लागल्याने महानगरपालिकेनेच पुढाकार घेत कंत्राटदार योगेश समरित यांच्याकडे थकित असलेले वीज देयक गुरुवारी दुपारी भरले. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला. आता भरलेले वीज देयकाची रक्कम मनपा कंत्राटदाराकडून कशी वसूल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कंत्राटदाराचा वीज वाचविण्याचाच वारंवार प्रयत्न
शहरात काही ठळक कारण नसताना अनेक वेळा अनियमित पाणी पुरवठा केला जाते. वीज वाचविण्यासाठीच कंत्राटदार असा प्रकार करीत असावे, असे आता बोलले जात आहे. याशिवाय पाणी टंचाईमुळे उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेला एक दिवसाआड पाणी पुरवठा सदर कंत्राटदाराने काहीही कारण नसताना पावसाळ्यापर्यंत अधेमधे सुरूच ठेवला होता. यातून उज्ज्वल कंस्ट्रक्शनने वीज बिज वाचवून नागरिकांना त्रास दिला.

कंत्राटदाराने वीज देयक अदा केले नाही. त्यामुळे पंपहाऊसचा वीज पुरवठा खंडित झाला होता. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेनेच दुपारी वीज देयक अदा केले. आता वीज पुरवठा सुरळीत झाला असून पाण्याच्या टाक्या भरणे सुरू आहे. गुरुवारी रात्री उशिरा नागरिकांना नळाद्वारे पाणी देण्यात येईल. शुक्रवारपासून शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल.
- अंजली घोटेकर,
महापौर, मनपा चंद्रपूर.

Web Title: Chandrapurkar approached due to contractor's enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.