चंद्रपूरकर हरवितात दिवसाला चार मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:26 AM2021-02-14T04:26:05+5:302021-02-14T04:26:05+5:30
चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात ...
चंद्रपूर : स्मार्ट मोबाईलचा वापर जसजसा वाढत आहे. त्याच तुलनेत मोबाईल चोरट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात पोलिसांकडे सुमारे १३४७ मोबाईल हरविल्याची, गहाळ झाल्याच्या तक्रार विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झाली आहे. सन २०२० ची मोबाईल गहाळ झाल्याची आकडेवारी २०१९ च्या तुलनेत निम्मी असली तरीही चिंताजनक आहे. स्मार्ट मोबाईल आता चैनीची वस्तू नाही तर सर्वसामान्यांची गरज बनली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलकडे बघितल्या जाते. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाल्याने तसेच अनेक खासगी कंपनीतील कामे ऑनलाईन सुरू असल्याने मोठ्यांपासून सगळ्याकडेच स्मार्ट मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईल चोरटेसुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून, मोबाईल चोरीच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून सन २०१९ मध्ये २९७९ तर २०२० मध्ये १३४७ मोबाईल गहाळ झाले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन तपास करून ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यास यश आले आहे.
बॉक्स
गर्दीच्या ठिकाणी जाताय, मोबाईल सांभाळा
यात्रा, समारंभ, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी मोबाईल चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. बहुतेक वेळा त्यांची टोळीच असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. गर्दीचे ठिकाण हेरून अत्यंत शिताफीने मोबाईल लंपास करतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मोबाईल सांभाळणे गरजेचे आहे.
बॉक्स
१३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात यश
मोबाईल चोरी झाल्यानंतर त्याची संपूर्ण कागदपत्राच्या आधार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात येते. हा तपास सायबर विभागाकडे असतो. तक्रार मिळताच पोलीस ट्रेस करीत असतात. मोबाईल ट्रेस झाल्यानंतर पोलिसांना शोध लावणे शक्य होत असते. साधारणात: ३० ते ४० टक्के मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सन २०१९ मध्ये २९७९ पैकी १४८० तर सन २०२० मध्ये १३४७ पैकी ७५६ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.