चंद्रपूरकर होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:29 PM2019-04-29T22:29:37+5:302019-04-29T22:30:07+5:30

चंद्रपूर शहर सध्या होरपळून निघत आहे. मागील पाच दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जणू संपूर्ण चंद्रपूर शहरालाच आग लावण्याचा विडा सूर्याने उचलला की काय, असा भास होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले.

Chandrapurkar roared | चंद्रपूरकर होरपळले

चंद्रपूरकर होरपळले

googlenewsNext
ठळक मुद्देसूर्याचा कोप कायम : जनजीवन प्रभावित, दुपारी रस्ते निर्मनुष्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर सध्या होरपळून निघत आहे. मागील पाच दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जणू संपूर्ण चंद्रपूर शहरालाच आग लावण्याचा विडा सूर्याने उचलला की काय, असा भास होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले. दुपारी चंद्रपुरातील रस्ते ओस पडत आहे. डोक्यावर टोपी, कानाला रुमाल बांधल्यानंतरही उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना धडकी भरत आहे. रविवारी ४७.२ अंश सेल्सिअस हे राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपुरात नोंदविण्यात आले. सोमवारीही ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
चंद्रपूरकरांना पूर्वी कधी एवढे उन्हाने घाबरविले नाही. मात्र यावेळी एप्रिल महिन्यातच तापमानाने कहर केला आहे. एप्रिल महिन्यातच चंद्रपूरकरांनी मे महिन्यातला नवतपा अनुभवला आहे. कडक उन्हाळ्यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्ते असे निर्मनुष्य झाले आहे. उष्माघाताच्या बचावासाठी बहुतांश नागरिकांच्या खिशात कांदा दिसून येतो.
उष्ण वारे वाहत आहेत. यावर्षीच्या उन्हाळा जीवघेणा ठरत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट आहे. एरवी गल्लीबोळात दुपारी फिरणारे फेरीवाले आता फिरताना दिसत नाहीत.
नागरिकांचीही वर्दळ नसते. दिवसभर कुलरच्या हवेत कामकाज सुरू आहे. बसेसमध्ये गर्दी कमी दिसू लागलेली आहे.
सूर्य प्रखरतेने तापत आहे. सर्वत्र वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम जाणवत आहे. अत्यावश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडले तरीही पाच मिनिटातच ते थंड ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
कुलर, पंख्यानेही दिलासा नाही
कालप्रवाहात तापमानापासून संरक्षित ठेवण्यासाठी कुलर, पंखे, एसी आदी इलेक्ट्रीक साधने उपलब्ध झालीत. दिवसागणिक वाढत जाणारे तापमान असह्य होत आहे. जिल्ह्यातील आबाल - वृद्ध रखरखत्या उन्हात जिथे गारवा मिळते तिकड धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तापमानाने एवढा उच्चांक गाठला आहे की घरातील कुलर, पंखेही नागरिकांना दिलासा देण्यास असमर्थ ठरत आहे.
रस्ते झाले निर्मनुष्य
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली. पारा ४७ अंशापार गेला आहे. दुपारच्या सुमारास गावातील रस्ते तर निर्मनुष्य दिसत आहेतच, सोबत शहराबाहेरील रस्तेही ओस दिसत आहे. चंद्रपूर-मूल, चंद्रपूर-बल्लारपूर, चंद्रपूर-घुग्घूस या मार्गावरही दुचाकींची वर्दळ दिसत नाही.

ग्रामीण भागातदेखील शेतीची कामांवर परिणाम होत आहे. पूर्वी शेतकरी उन्हाळ्यात दिवसभर शेतात राबताना दिसायचे. मात्र आता उन्हामुळे त्यांनाही घाबरवून टाकले आहे. दुपारी १२ वाजताच शेतकरी शेतातून घरी येऊ लागले आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पुन्हा शेतात कामासाठी जाताना दिसत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सर्वाधिक महत्त्वाच्या आठवडी बाजारातही याचा परिणाम दिसत आहे. कोठारी येथे रविवारी आठवडी बाजारात शुकशुकाट होता.

Web Title: Chandrapurkar roared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.