कोरोना चाचण्यांवर चंद्रपूरकरांचा रोज १३ लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:26 AM2021-04-06T04:26:47+5:302021-04-06T04:26:47+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढवली आहे. जिल्ह्यात ॲन्टिजेन चाचणीचे ४३ तर ...
चंद्रपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढवली आहे. जिल्ह्यात ॲन्टिजेन चाचणीचे ४३ तर आरटीपीसीआर तपासणीचे शासकीय १८ व दोन खासगी अशी एकूण २० केंद्र तसेच नव्यानेच सुरु केलेली पाच फिरती पथके आहेत. एका ॲन्टिजेन चाचणीसाठी साधारणत: ४०० तर आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये खर्च येतो. जिल्ह्यात दररोज ॲन्टिजेन व आरटीपीसीआरच्या मिळून २,५०० ते ३,००० हजार चाचण्या होतात. या चाचण्यांचा रोजचा सरासरी खर्च १३ लाखांच्या आसपास आहे. हा खर्च शासकीय निधीतून प्रशासनातर्फे भागवला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढायला लागली आहे. त्यापूर्वी एक ते दोन हजारांच्या जवळपास चाचण्या व्हायच्या. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या वाढत आहे. दररोज २०० ते ३००च्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता जिल्ह्यात आरटीपीसीआर व ॲन्टिजेन अशा २,५०० ते ३,००० हजार चाचण्या करण्यात येत आहेत. यासाठी प्रशासनाला आर्थिक भार सहन करावा लागत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविणे हाच पर्याय असल्याचे मानले जात आहे.
बॉक्स
जिल्ह्यात दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्या ३,०००
आजपर्यंत झालेल्या ॲन्टिजेन चाचण्या १,४१,७३५
आजपर्यंत झालेल्या आरटीपीसीआर चाचण्या १,४०,४१५
बॉक्स
५०० रुपये खर्च येतो एका चाचणीला
१) ॲन्टिजेन चाचणी करताना आरोग्य अधिकारी घालणारे कीट, ॲन्टिजेन कीट पकडून साधारणत: ४०० रुपयांपर्यंतचा खर्च होतो.
२) आरटीपीसीआर चाचणी करताना साधारणत: ५०० रुपयांपर्यंतचा खर्च एका व्यक्तीला येतो. प्रशासनाकडून तपासणी मोफत केली जाते.
कोट
जिल्ह्यात आरटीपीसीआर व ॲन्टिजेन मिळून २,५०० ते ३,००० हजार चाचण्या करण्यात येतात. आरटीपीसीआरसाठी एका व्यक्तीला साधारणत: ५०० रुपये तर ॲन्टिजेनसाठी ४०० रुपयांपर्यंत खर्च येतो. नागरिकांची मोफत कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर