अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपूरकर वैतागले

By admin | Published: May 11, 2017 12:33 AM2017-05-11T00:33:50+5:302017-05-11T00:33:50+5:30

चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात येऊन पाच वर्ष लोटली आहे. या पाच वर्षात शहरात अनेक सकारात्मक बदल झाले असले तरी...

Chandrapurkar would wait for irregular water supply | अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपूरकर वैतागले

अनियमित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपूरकर वैतागले

Next

रवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात येऊन पाच वर्ष लोटली आहे. या पाच वर्षात शहरात अनेक सकारात्मक बदल झाले असले तरी शहरातील पाण्याची बोंब मात्र कमी झालेली नाही. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वैतागले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीचा मनमानी कारभार व महापालिकेचा दुर्लक्षितपणा, यासाठी कारणीभूत ठरत आहे. कुठे तासभर तर कुठे त्याहून कमी काळ नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. नळाची धारही फारशी मोठी नसते. महापालिका झाल्यानंतर कोट्यवधींचा निधी शहरासाठी येत असताना नागरिकांना गरजेपुरते पाणीही मिळू नये, ही बाब संताप अनावर करणारी आहे.
चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. सद्यस्थितीत चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणातही ४७.०८ टक्के जलसाठा आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले.
पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील अनेक वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. हॉस्पीटल वार्ड, रामनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, भानापेठ वार्ड, बालाजी वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, वडगाव, जीवन ज्योती कॉलनी, जगन्नाथबाबा नगर, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात अतिशय कमी पाणी पुरवठा केला जात आहे. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. हे पाणी पिण्यायोग्य नाही.

पाईपलाईन तीच; कनेक्शन वाढले
पाण्याची टॉकी ते फिल्टर प्लॅन्टमध्ये असणारी पाईप लाईन मोठी असते. त्यानंतर मुख्य पाईप लाईनद्वारे हे पाणी संबंधित प्रभागात पोहचते. त्यानंतर ३ ते ४ इंचांच्या पाईपमधून हे पाणी वितरित केले जाते. पूर्वी ५० कनेक्शनधारकांना ज्या पाईनलाईनवरून पाणी वितरित केले जाते, त्याच पाईनलाईनवर आता १०० ते २०० कनेक्शन आहेत. त्यामुळे पाहिजे तसा पाणी पुरवठा होत नाही.

शहराला हवे ४० दशलक्ष घनमीटर पाणी
चंद्रपूर शहराची लोकसंख्या चार लाखांच्या घरात आहे. संपूर्ण शहराला दररोज ४० दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला ९० ते १०० लिटर पाणी दररोज लागते. मात्र यापैकी ३० ते ३५ लिटरही पाणी दरडोई मिळत नाही.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
मागील कित्येक वर्षांपासून आम्ही पाण्यासाठी संघर्ष करीत आहोत. मात्र आमच्या वडगाव प्रभागातील पाण्याची बोंब कमी झाली नाही. नळाला अत्यल्प आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने आम्ही वैतागलो आहोत.
-विवेक नंदूरकर रा. वडगाव
आम्ही विठ्ठल मंदिरजवळ राहतो. या परिसरात नेहमीच पाणी पुरवठ्यात अनियमितता असते. नळ आलेच तर अतिशय कमी पाणी मिळते.
-श्रीकांत खडसे
ँमागील अनेक दिवसांपासून पाणी पुरवठ्याबाबत आमच्या परिसरात प्रॉब्लेम आहे. नळाला अतिशय कमी पाणी येते. दोन-तीन दिवसानंतर नळच येत नाही.
-अभय बावणे

पाणी वितरण प्रणालीतील मशनरीज जुनी आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यात फरक पडत असावा. लवकरच या मशनरीज बदलविल्या जात आहे. याशिवाय भारनियमनामुळे पाणी पुरवठा प्रभावित होतो. यावरही तोडगा काढला जाईल. पाणी पुरवठ्यासंदर्भात कुणाचीही तक्रार आल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाते.
-विजय देवळीकर,
उपायुक्त, महानगरपालिका, चंद्रपूर.

Web Title: Chandrapurkar would wait for irregular water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.