शाळांच्या ग्रंथदिंडीने चंद्रपूरकरांचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:21 PM2017-11-28T23:21:44+5:302017-11-28T23:22:46+5:30
विविध वेशभुषेत शाळांचा सहभाग, लेझीम पथक, एनसीसी, स्कॉऊड गाईड, एनएसएस पथक तसेच शहराच्या नावलौकिकाला साजेशी आकर्षक सजवलेली ग्रंथदिंडी मंगळवारी ग्रंथोत्सव कार्यक्रमानिमित्त चंद्रपुरात बघायला मिळाली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : विविध वेशभुषेत शाळांचा सहभाग, लेझीम पथक, एनसीसी, स्कॉऊड गाईड, एनएसएस पथक तसेच शहराच्या नावलौकिकाला साजेशी आकर्षक सजवलेली ग्रंथदिंडी मंगळवारी ग्रंथोत्सव कार्यक्रमानिमित्त चंद्रपुरात बघायला मिळाली. ज्युबिली हायस्कूल ते प्रियदर्शिनी सभागृहापर्यंत ही ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली.
ग्रंथदिंडीनंतर चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव २०१७ चे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. श्रीकांत गोडबोले यांनी सामाजिक पुरूषार्थ जागविण्यासाठी वाचन करण्याचे प्रतिपादन केले.
सकाळी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमुख वक्ते जेष्ठ साहित्यिक लेखक डॉ. श्रीकांत गोडबोले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महापौर अंजली घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, जिल्हा ग्रंथपाल आर.जी.कोरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून जाहीर करण्यात आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानी
दुपारच्या सत्रात ‘पर्यावरण सद्य:स्थिती व उपाय’ यावर विद्यार्थ्यांचा परिसंवाद रंगला. त्यानंतर जेष्ठ कवी प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. तर सांयकाळी वºहाडी झटका हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी सकाळी ग्रंथ प्रदर्शन व विक्री दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
आज होणार समारोप
बुधवारी ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता व्याख्यान, दुपारी १२ ला कवी संमेलन, दुपारी ३ वाजता वादविवाद स्पर्धा तर सांयकाळी ५ वाजता ग्रंथालयात अभ्यास करुन शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सांयकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रम होणार आहे.