शेतकरी कुटुंबातील दीपक ठरला ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हेनिंग ग्लोबल लीडर’; ४५ लाखांची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 05:40 PM2022-07-02T17:40:53+5:302022-07-02T17:58:21+5:30
अवघ्या २४ व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळविणारा तो देशातील पहिला तरुण वकील ठरला आहे.
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील शेतकरी कुटुंबातील ॲड. दीपक यादवराव चटप हा ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’ ठरला आहे. ब्रिटिश सरकारच्या ‘चेव्हेनिंग’ या जागतिक प्रतिष्ठेच्या ४५ लाखांच्या शिष्यवृत्तीचा तो मानकरी ठरला. अवघ्या २४ व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळविणारा तो देशातील पहिला तरुण वकील आहे.
सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार शिष्यवृत्ती देते. लंडनच्या ‘सोएस’ या सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी ॲड. दीपक चटप याची निवड झाली आहे. त्याच्या लंडनमधील शिक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सरकारने स्वीकारली. ॲड. चटप हा ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक असून ही संस्था दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करते. शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप, पद्मश्री डॉ. अभय बंग, ॲड. असीम सरोदे व माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत त्याने केलेले सामाजिक व विधिविषयक काम दखलपात्र ठरले. लंडन स्कूल ऑफ इकॉनाॅमिक्सला शिक्षण घेणारा मित्र प्रवीण निकम, लंडन विद्यापीठातील सोहेल भट्ट, भाऊ डॉ. जयदीप चटप यांनी दीपकला प्रेरणा दिली. राजू केंद्रे, अविनाश पोईनकर, बोधी रामटेके, वैष्णव इंगोले आदी मित्रांनी त्याला साथ दिली.
अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी
ॲड. दीपक चटप याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडचांदूर येथे तर पुण्यातून तो एलएलबी झाला. शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका त्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. शेतकरी आत्महत्येविषयी मानवाधिकार आयोगाकडे त्याने अनेक तक्रारी दिल्या. ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह आणि ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ ही दोन पुस्तके त्याने लिहिली. कोरो इंडिया फेलोशिपद्वारे संविधानिक हक्कांवर तो काम करीत आहेत.
लखमापूर ते लंडन हा प्रवास सोपा नव्हता. मात्र कुटुंब व मित्रांनी खंबीर साथ दिल्याने ब्रिटिश सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकलो. लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्य करणार आहे.
- ॲड. दीपक चटप, लखमापूर, जि. चंद्रपूर