मिरज सिनेमामुळे चंद्रपूरची शान वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:35 PM2019-02-13T22:35:47+5:302019-02-13T22:36:07+5:30
चंद्रपूर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहु नये. हा प्रयत्न आहे. या जिल्ह्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. चंद्रपुरात मल्टीप्लेक्सची कमी होती. मिरज सिनेमाच्या माध्यमातून ही उणीवही आता भरून निघाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहु नये. हा प्रयत्न आहे. या जिल्ह्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. चंद्रपुरात मल्टीप्लेक्सची कमी होती. मिरज सिनेमाच्या माध्यमातून ही उणीवही आता भरून निघाली आहे. मिरज सिनेमाचे सर्वेसर्वा दिनेश चोरडिया यांनी अतिशय देखण्या अशा वास्तूची निर्मिती करून चंद्रपूरात पहिल्यांदाच मल्टीप्लेक्स थिएटरर्स सुरू केले. ही बाब चंद्रपूरची शान वाढविणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
चंद्रपूर येथे एमडीआर मॉल अॅन्ड मिरज सिनेमाचे उद्घाटन ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मिराज सिनेमाचे सर्वेसर्वा दिनेश चोरडिया विराजमान होते. चोरडिया परिवारासह शहरातील गणमान्य मंडळींचीही याप्रसंगी आवर्जून उपस्थिती होती.
ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, १९८६ नंतर टेलीव्हिजनचा जमाना आला. त्यानंतर लोक घरातच बसून मनोरंजन करण्यावर भर देत होते. मात्र नंतरच्या काळात सिनेमागृहात चित्रपट बघण्याचा आनंद घरात बसून येत नसल्याचे लक्षात आल्याने लोक थिएटरमध्ये जावू लागले. आता तर इलेक्ट्रीकल उपवासासाठी थिएटरसारखे दुसरे साधन नाही. थिएटरमध्ये बसल्यानंतर तीन तास फेसबूक, वॉटस्अॅपपासून सुटका झाल्यासारखे वाटते. यामुळे आता पुन्हा थिएटर्सला चांगले दिवस आले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी थिएटरर्स सिनेमा बघायला गेल्यानंतर आलेल्या अनुभवही सांगितले.