मराठी चित्रपटातील लावणीवर थिरकतेय चंद्रपूरची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 12:57 PM2022-02-15T12:57:52+5:302022-02-15T13:15:47+5:30
चंद्रपूर बाबूपेठ येथील महात्मा फुले चौकात राहणाऱ्या पूजा मडावी हिचे वडील विजय मडावी ऑटोरिक्षाचालक, तर आई अल्का मडावी या गृहिणी आहेत.
परिमल डोहणे
चंद्रपूर : आपल्या नृत्यकलाविष्काराने चंद्रपूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी चंद्रपूरची पूजा मडावी-चौधरी आता झिरा फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत ‘गाव आलं गोत्यात, १५ लाख खात्यात’ या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावरील ‘इश्कात होऊ या दंग’ या लावणीत थिरकताना दिसत आहे. या लावणीत पूजाला चंद्रपूरची वसुंधरा गावतुरे हीसुद्धा साथ देत आहे.
यापूर्वीही पूजाच्या ‘डॅड चीअर्स’ या चित्रपटामधील ‘सत्यवेलीची नशा’ या आयटम साँगला प्रेक्षकांनी चांगलेच उचलून धरले होते. मराठी चित्रपटातील लावणी व आयटम सॉंग गाजवणारी पूजा मडावी ही चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली कथ्थक नृत्यकलाकार असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर बाबूपेठ येथील महात्मा फुले चौकात राहणाऱ्या पूजा मडावी हिचे वडील विजय मडावी ऑटोरिक्षाचालक, तर आई अल्का मडावी या गृहिणी आहेत. लहानपणापासूनच पूजाला नृत्याची आवड होती. वयाच्या दहा वर्षांपासून ती नृत्य करीत होती. त्यामुळे आई-वडिलांनी तिला शिवा सर यांच्याकडे नृत्यासाठी नाव नोंदविले. त्यानंतर तिने भाना पेठ येथील कथ्थक प्रशिक्षक ज्योत्स्ना टेकाडे यांच्याकडे कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. जिल्ह्यात होणाऱ्या नृत्य स्पर्धेत पूजाने आपले अधिराज्य गाजवले.
दरम्यान पूजाचे लग्न चंद्रपूर येथील साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पराग चौधरी यांच्याशी झाले. त्यांनीसुद्धा तिच्या आईवडिलांप्रमाणेच नृत्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर पूजाने कधी मागे वळून बघितलेच नाही. आता तर थेट तिने रुपेरी पडद्यावर भरारी घेतली असून दिग्दर्शक शुभम रे यांच्या ‘गाव आलं गोत्यात, १५ लाख खात्यात’ या मराठी चित्रपटात लावणी करताना दिसत आहे. ११ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात झळकला आहे. त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.
पुन्हा दोन चित्रपट प्रतीक्षेत
पूजाने दोन वर्षांपूर्वी ‘डॅड चीअर्स’ या चित्रपटात आयटम सॉंग करून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर आता ‘गाव आलं गोत्यात, १५ लाख खात्यात’ या चित्रपटात लावणी करताना दिसून येत आहे. यासोबतच अगामी ‘छोटा पॉकेट लव्ह’ व अन्य एका चित्रपटात नृत्य करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.
चित्रपटातून समाजव्यवस्थेवर भाष्य
‘गाव आलं गोत्यात, १५ लाख खात्यात’ या चित्रपटातून दिग्दर्शिक शुभर रे यांनी समाजव्यवस्था व जनतेच्या मानसिकता यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे सहनिर्माता गणेश पेघन तर प्रकाश भागवत, प्रिया गमरे, संजीवनी जाधव, विराग जाखड, डॉ. विलास उजवणे, रंगराव घागरे आदी कलाकारांनी भूमिका साकारली आहे. कॅमेरामन निखिल कांबळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. तर चंद्रपूरच्या पूजा मडावी व वसुंधरा गावतुरे या लावणी करताना दिसून येणार आहेत.