कर थकबाकीने चंद्रपूरची पाणीपुरवठा योजना कोलमडण्याच्या मार्गावर !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 11:45 AM2024-11-29T11:45:54+5:302024-11-29T11:47:03+5:30

पाणीकर भरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष : महापालिकेवर आर्थिक भुर्दंड

Chandrapur's water supply scheme is on the verge of collapse due to tax arrears! | कर थकबाकीने चंद्रपूरची पाणीपुरवठा योजना कोलमडण्याच्या मार्गावर !

Chandrapur's water supply scheme is on the verge of collapse due to tax arrears!

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
महानगरपालिकेने शहरातील सर्व नळजोडणीवर जलमापक (मीटर) लावले. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष वापर सुरू आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही नागरिक पाणीकर भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे थकबाकी वाढली. नागरिकांनी मनपाला सहकार्य केले नाही तर ही योजना कोलमडून अन्य सोई- सुविधांवरही अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


चंद्रपूरला इरई नदी व धरणावरून पाण्याची उचल केली जाते. रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा होतो. शहराची गरज पाहता सध्या ४२ दशलक्ष लीटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज सुरू आहे. अमृत योजना सुरू होण्यापूर्वी शहरात ३५ हजार अधिकृत नळ कनेक्शन होते. अमृत योजनेअंतर्गत वाढ होऊन ६२ हजारपर्यंत झाले. काही नळांना पाणी कमी येणे किंवा प्रेशर कमी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तपासणीनंतर, उगाच नळ सुरू ठेवणे, वाहने धुण्यास वापर करणे, अशा निष्काळजीपणाने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. 


१४ टक्के नळजोडणीधारकांनीच भरला पाणीकर
५० हजार ८९१ घरी मनपाद्वारे आतापर्यंत मीटर लावण्यात आले. यापैकी केवळ १४ टक्के नळजोडणी धारकांनीच पाणीकराचा भरणा केला. त्यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत आहे. अप्राप्त देयकांमुळे संपूर्ण पाणी पुरवठा योजना तोट्यात जाण्याची शक्यता आहे. काही नागरिकांचे देयक हे शून्य रुपये आले. हे तेव्हाच शक्य असते जेव्हा मीटरला लागून असलेला पाइप काढला जातो. ज्यामुळे पाण्याचा वापर करताना मीटर बंद असते. बिल रीडिंग अतिशय कमी येते किंवा शून्य येते. पाणी मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या नागरिकांचा पुरवठा बंद व दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. 


नागरिकांच्या आग्रहाखातरच बसविले घरोघरी मीटर

  • सर्वांना आवश्यक ते पाणी मिळावे यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक होते. 
  • मीटर लावण्यापूर्वी नळ जोडणीधारकांकडून सरसकट वार्षिक पाणीपट्टी कर घेतला जात होता. तो सर्वांना सारखाच लागू होता. त्यामुळे पाण्याचा किती वापर प्रत्ये- काकडून केला जातो. याचा अंदाज बांधणे कठीण होते. 
  • अखेर नागरिकांच्या आग्रहाखातर 'पाण्याचा जेवढा वापर तेवढेच देयक' या सूत्रानुसार मनपाकडून घरोघरी मीटर बसविण्यात आले.


"पाणी कराची थकबाकी वाढली. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा खर्च मालमत्ता कर व इतर उत्पन्नातून भागवावा लागतो. नागरिकांनी पाणी कर भरला नाही तर कराच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या अन्य सुविधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. थकबाकी वाढतच राहिली तर ही योजना चालविणे शक्य होणार नाही. त्यामुळे नळजोडणीधारकांनी पाणीकर प्रामाणिकपणे भरावा. कुठे मीटर बंद करून पाणी वापर होत असेल तर तसे मनपाला कळवावे." 
-विपीन पालीवाल, आयुक्त मनपा

Web Title: Chandrapur's water supply scheme is on the verge of collapse due to tax arrears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.