चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदी रेखा कारेकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 05:33 PM2020-01-04T17:33:43+5:302020-01-04T17:35:59+5:30
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपाच्या संध्या गुरनुले तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपाच्याच रेखा कारेकार विजयी झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
मुल तालुक्यातील राजोली-मारोडा जि.प. क्षेत्राच्या सदस्या असलेल्या संध्या गुरनुले यांनी यापूर्वीही चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले असून चंद्रपूर जिल्हा परिषदेतील त्या ज्येष्ठ सदस्या आहे. उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या रेखा दिलीप कारेकार या चिमूर तालुक्यातील खडसंगी-मुरपार क्षेत्राच्या जि.प. सदस्या आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हयाच्या ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वशक्तीनिशी प्रयत्न करावा, असे आवाहन करत विकास प्रक्रियेत आवश्यक सहकार्य करण्याबाबत मुनगंटीवार यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांना आश्वस्त केले.
जिल्हयातील 8 पंचायत समित्यांवर भाजपाचे सभापती व उपसभापती निवडून आले असून सावली व जिवती या 2 पंचायत समित्यांमध्ये भाजपाचे उपसभापती निवडून आले व जिल्हा परिषदेवरील वर्चस्व सुद्धा कायम राखल्याबद्दल भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे, ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडेआदींची उपस्थिती होती.