युवकांच्या पुढाकारातून समाजात परिवर्तन शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:23+5:302020-12-26T04:23:23+5:30
पुरुषोत्तम सातपुते : कुणबी समाज मंडळातर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन उपवर-वधू मेळावा चंद्रपूर : समाजातील युवक एकत्रित आल्यास काय होऊ शकते, ...
पुरुषोत्तम सातपुते : कुणबी समाज मंडळातर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन उपवर-वधू मेळावा
चंद्रपूर : समाजातील युवक एकत्रित आल्यास काय होऊ शकते, हे लोकसभा निवडणूक, ओबीसी विशाल मोर्चा आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दिसून आले. युवकच समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. ज्या समाजातील युवक जागरूक, धडपडीचे असतील, त्या समाजाला कशाचीही कमतरता नसल्याचे मत धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी केले.
कुणबी समाज मंडळ चंद्रपूर आणि मध्यवर्ती धनोजे कुणबी समाजपुरस्कृत राज्यस्तरीय त्रीदिवसीय ऑनलाइन उपवधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता कुणबी समाज मंदिर येथे करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ धनोजे कुणबी मध्यवर्ती समितीचे सचिव पवन राजूरकर, अनंत एकरे, पांडुरंग जरीले, डॉ. संजय लोहे, अॅड. संतोष कुचनकर, उत्तम मोहितकर, रमेश राजूरकर, भरत पोतराजे, दिनकर डोहे, पाडुरंग टोंगे, मधुकर ढोके, सचिव अतुल देऊळकर, कोषाध्यक्ष अरुण मालेकर, सहसचिव विलास माथनकर, सुरेश ढवस, आनंद वैद्य, विनोद पिंपळशेंडे उपस्थित होते.
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी, समाजाच्या प्रगतीसाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. आपला समाजबांधव एखाद्या क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याला प्रत्येकाने मदत करायला हवी. त्याचे कुणीही पाय खेचण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले.
उपस्थित मान्यवरांचीही समायोचित भाषणे झालीत. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ''रेशीमगाठी'' स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. निवडक उपवर-उपवधुंचा परिचय मेळावा पार पडला. या ऑनलाइन मेळाव्यासाठी विजय मुसळे यांचे विशेष योगदान लाभले. संचालन प्रा. नामदेव मोरे तर आभार विलास माथनकर यांनी केले. त्रीदिवसीय ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्यात २६ व २७ ला इच्छुक उपवर-उपवधुंचा परिचय घेण्यात येणार आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व समाजबांधव, उपवर-उपवधूंनी कुणबी समाज चंद्रपूर या यु-ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल ऑयकॉनला प्रेस करावे, असे आवाहन कुणबी समाज मंडळ, उपवर-वधू परिचय मेळावा आयोजन समिती चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.