प्रभारी अधिकाऱ्यांमुळे कामांची गती मंदावली
By admin | Published: June 19, 2014 12:00 AM2014-06-19T00:00:01+5:302014-06-19T00:00:01+5:30
ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे.
जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची दमछाक: ग्रामीण विकासाला लागणार ब्रेक
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे. प्रभार सांभाळताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. विकास कामात अनेक अडचणी येत असल्याने ‘टार्गेट’ पूर्ण कसे होणार, असा प्रश्न आता कार्यरत अधिकाऱ्यांना पडला आहे.
मागील एक वर्षांपासून येथील मुख्य कार्यपालन अधिकारी स्थायी नव्हते. शिंदे यांची बदली झाल्यानंतर सी.एस. डहाळकर यांच्याकडे जिल्हा परिषदेचा प्रभार आला. त्यानंतर डॉ. माधुरी खोडे आल्या. त्या काही दिवस येथे राहिल्यानंतर त्यांची भंडारा येथे बदली झाली. त्यानंतर संपदा मेहतांनी पदभार सांभाळला. मात्र त्यांची गडचिरोली येथे बदली झाली. आता कुठे आशुतोष सलिल यांच्या रुपाने जिल्हा परिषदेला स्थायी मुख्य कार्यपालन अधिकारी मिळाले आहेत. मात्र तोपर्यंत जिल्हा परिषदेतील काही विभागप्रमुखांची बदली झाली तर काही सेवानिवृत्त झाले.त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या अर्ध्याअधिक विभागाचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे अनेक कामात अडचणी येत असून विकास कामांची आशा असलेल्या नागरिकांची निराशा होत आहे.
येथील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ओमप्रकाश गुढे यांची बदली नागपूर येथे झाली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही कुणीही आले नसल्याने त्यांचा प्रभार गटशिक्षणाधिकारी रामदास पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कार्यकारी बांधकाम अधिकारी मून सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रभार शेट्टी यांच्याकडे आहे. जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार पवार यांच्याकडे होता. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे. सिंचन विभागाची जबाबदारी नागदेवते यांच्याकडे होती. ते सेवाविृत्त झाल्याने त्यांच्या भार बगमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
शिक्षणाधिकारी माध्यमिक रविकांत देशपांडे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. तेही रवाना होणार आहेत. मात्र त्यांच्या जागेवर अद्यापही कुणीही आले नाही.
समाजकल्याण अधिकारी विजय वाकुलकर यांच्याकडे जात पडताळणी कार्यालयाचा अतिरिक्त भार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार यांच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणेची जबाबदारी आहे. काही विभागात प्रभारी असल्याने तर काही विभागात दोन ते तीन विभागाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यांवर असल्याने त्यांचीही दमछाक होत आहे.