सूडबुद्धीने कारवाईचे आरोप बिनबुडाचे
By admin | Published: September 25, 2016 01:25 AM2016-09-25T01:25:05+5:302016-09-25T01:25:05+5:30
भद्रावती शहरातील विकासात्मक कामे करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली.
पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांचा पलटवार
भद्रावती : भद्रावती शहरातील विकासात्मक कामे करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. यादरम्यान, मोहीतकर यांनी सदर कारवाई पक्षपातीपणाने व सुडबुद्धीने केल्याचा आरोप केला. हे संपूर्ण आरोप निराधार व बिनबुडाचे असल्याची माहिती नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी न.प. भद्रावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मोहीतकर यांनी निवडणुकीत प्रचार न केल्यामुळे माझे सुडबुद्धीने अतिक्रमण काढले, असा आरोप केला होता. खरे म्हणजे मोहीतकर हे २००८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे असताना त्यांना फक्त २१ मते मिळाली. अशा व्यक्तीकडून मी काय प्रचाराची अपेक्षा करणार असा प्रश्नही धानोरकर यांनी उपस्थित केला. घुटकाळा, झाडे प्लॉट हा चिचोर्डी ग्रा.पं. काळातील ले-आऊट असून ग्रा.पं. काळापासून त्या ठिकाणी घरे बांधण्यात आली आहे. नगर परिषदेकडून धांडे, कत्तुरवार, मोहीतकर व गुंडावार यांच्या घरासमोरून आर.सी.सी. पाईप नालीचे बांधकाम करण्यात आले होते. त्या नाली बांधकामाच्या समोर रस्त्यापर्यंत पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याने संबंधित नागरिकांचे अतिक्रमण काढण्यात आले.त्याचप्रमाणे मोहीतकर हे मूळ ले-आऊटमध्ये भागधारक नसून घर विकत घेतलेले घरमालक आहेत. भद्रावती शहरातील मुख्य रस्त्यावर व विविध वॉर्डातील रस्त्यावर अतिक्रमण केलेले असेल अशा सर्व अतिक्रमणधारकांनी स्वत:चे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करावे.
तसे न केल्यास भद्रावती न.प. प्रशासनाकडून २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे धानोरकर म्हणाले. पत्रकार परिषदेला नगरपरिषद उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)