रुग्णवाहिकांचे जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:59+5:302021-04-29T04:20:59+5:30
चंद्रपूर : रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन ...
चंद्रपूर : रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले आहेत. यापेक्षा जादा दर रुग्णवाहिकाधारकांनी घेतल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली.
पहिले २५ किलोमीटर अंतर अथवा दोन तास यासाठी मारुती व्हॅनकरिता ८०० रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १५ रुपये, टाटा सुमो व मॅटॅडोरसदृश वाहनाकरिता पहिल्या २५ किलोमीटरसाठी ९०० रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १५ रुपये, टाटा ४०७, स्वराज माझदा या वाहनांसाठी १२०० व त्यापुढे प्रतिकिलोमीटर १८ रुपये, आय.सी.यू. अथवा वातानुकूलित वाहनाकरिता २००० रुपये व पुढे प्रतिकिलोमीटर २५ रुपये याप्रमाणे रुग्णवाहिकेचे दर ठरविण्यात आले आहेत.
जे वाहनचालक व मालक विहीत भाडेदरापेक्षा जास्त भाडेआकारणी करतील, त्यांच्यावर पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये पाच हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये दहा हजार व तिसऱ्या गुन्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिला आहे.