वाहनाचा पाठलाग करून तस्करांना पकडले
By admin | Published: February 6, 2017 12:40 AM2017-02-06T00:40:05+5:302017-02-06T00:40:05+5:30
भरधाव जात असलेल्या संशयित महिंद्रा बोलेरो गाडीचा गायमुख रोडवर पाठलाग करुन पोलिसांनी दारू तस्करांना पकडले.
तळोधी (बा.) : भरधाव जात असलेल्या संशयित महिंद्रा बोलेरो गाडीचा गायमुख रोडवर पाठलाग करुन पोलिसांनी दारू तस्करांना पकडले. यात त्या वाहनातील तब्बल आठ लाख रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली व तिघांना अटक केली. ही कारवाई आज रविवारी करण्यात आली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक तोंडावर असताना मतदाराना खूश करण्यासाठी या मार्गाने अवैध दारु पुरवठा होत असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली. त्यावरून तळोधी (बा.) चे ठाणेदार विवेक सोनवणे यांनी सापळा रचून बाळापूरकडून तळोधीकडे येत असताना बोलेरो गाडीचा पाठलाग करून गाडीला अडविले. बोलेरो गाडीमध्ये देशी दारुचे १६० बॉक्स (किंमत ८ लाख रुपये) व बोलेरो गाडी (क्रमांक एमए- ३६ एफ ३१२५ ) चार लाख रुपये, असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी जितेंद्र व्यंकट वासनिक (२८) रा. शेळी जि. भंडारा, नितेश मुखरु जांभुळे (२३) रा. कन्हाळगाव (शेळी) जि. भंडारा व सुरज नामदेवराव बगमारे (२७) रा. बोडेगाव ता. ब्रह्मपुरी या तिघांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत ६५ (ई) ८३ नुसार कारवाई करुन अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय मांढरे, पोलीस हवालदार संतोष सोनटक्के, पोलीस शिपाई राहुल घुडसे, हंसराज सिंडा चांगदेव गिरडकर, शैलेश कोरे यांनी केली. (वार्ताहर)
महिलांच्या मदतीने दारुतस्कर गजाआड
नंदोरी : जिल्ह्यात सर्वत्र दारूबंदी असताना वणी येथून माजरी - नंदोरी मार्गाने दारुची अवैधवाहतूक होत आहे.नंदोरी येथील गाडगेबाबा चौकातून जाणारा रस्ता चंद्रपूर हायवेला जुळत असलेल्या रस्त्यावरुन मोठ्य प्रमाणात दारुची तस्करी केली जात आहे. वणीवरुन याच मार्गाने येणारी विना नंबरप्लेटची दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने पिशवीतील देशी दारूच्या बॉटल खाली पडल्या. त्या उचलण्याच्या प्रयत्नात असताना चौकात कापूस भरणाऱ्या युवकांनी धाव घेऊन दारु तस्कराना पकडले. दरम्यान तस्काराचा सहकारी अजित रा. दुर्गापूर याने दुचाकी सोडून पलायन केले व घनशाम कैलास वानखेडे रा. दुर्गापूर यास महिला व युवकांनी घेराव घालून पोलीस स्टेशन वरोरा येथे सूचना दिली. पोलिसांच्या ताब्यात देत १५० देशी दारुच्या बॉटल्स व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली.अवैध दारु विक्रेता व तस्करी याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांचा खरपूस समाचार घेतला. यावर पोलीस उपनिरीक्षक मुलेपोड यांनी गावातील तंटामुक्त समिती व पोलीस पाटीलांकडून गावात दारु मिळतच नसल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती सर्व ग्रामस्थांना दिली.आठ दिवसता या मार्गाने होणारी अवैध दारू तस्करी व विक्री बंद न झाल्यास आम्ही चौकांमध्ये दारुचे दुकान लावू, असा इशारा नंदोरी येथील महिलांनी दिला आहे.