बनावट फॉर्म भरून सुरक्षा रक्षकांना फसविले

By admin | Published: January 10, 2016 12:56 AM2016-01-10T00:56:38+5:302016-01-10T00:56:38+5:30

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात कार्यरत कंत्राटी सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्याचे आमिष दाखवून विदर्भ प्रहार कामगार संघटनेने ...

Cheating the security guards by filling a fake form | बनावट फॉर्म भरून सुरक्षा रक्षकांना फसविले

बनावट फॉर्म भरून सुरक्षा रक्षकांना फसविले

Next

पोलिसात तक्रार : विदर्भ प्रहार कामगार संघटनेवर आरोप
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात कार्यरत कंत्राटी सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्याचे आमिष दाखवून विदर्भ प्रहार कामगार संघटनेने प्रत्येक सुरक्षा रक्षकांकडून २ हजार ५०० रु. घेतले. यासाठी या संघटनेने नियमबाह्य बनावट फॉर्मही छापून टाकले. सुरक्षा रक्षकांना आपण फसविले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी कामगार आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत कामगार अधिकाऱ्यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे रितसर तक्रार नोंदविली आहे.
येथील सुरक्षा रक्षक मंडळाचे काम सुरू झाल्यानंतर मुख्य नियोक्त्यांची प्रथम नोंदणी करून त्यांच्याकडे कार्यरत सुरक्षा रक्षकांची यादी संबधित नियोक्त्याकडून कामगार अधिकाऱ्यांकडे जाते. त्यानंतर या यादीप्रमाणे सुरक्षा रक्षकांची नियमाप्रमाणे नोंदणी करून मुख्य नियोक्त्यांकडे ती सुपुर्द केली जाते. मात्र विदर्भ प्रहार कामगार संघटनेने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात कार्यरत कंत्राटी सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप संजय महेश, कादिर शेख, विनोद अलोने, श्रीकांत ठाकुर, गोपाल दास, संतोष पुराणिक, राजकुमार मंडळ, प्रदीप वसेकर यांच्यासह अनेक कामगारांनीच केला आहे. यासाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा मंडळाचा फार्म विदर्भ प्रहार कामगार संघटनेने स्वत: प्रकाशित करून सुक्षा रक्षकांकडून भरून घेण्याचा प्रतापही केला आहे. संबंधित कार्यालयात तो फार्म जमा करण्यात आला आहे.
(संबंधित वृत्त पान ४ वर)

नागपूर कार्यालयाच्या तोंडी परवानगीवरूनच
फॉर्म छापले - हर्षल चिपळूणकर

आपल्या संघटनेने फॉर्म छापले हे खरे आहे, मात्र ते छापण्यासाठी नागपूरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने आम्हाला तोंडी परवानगी दिली होती. त्या आधारावरच फॉर्म छापण्यात आल्याची स्पष्टोक्ती विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड. हर्षलकुमार चिपळूणकर यांनी केली. या संदर्भात त्यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, मंडळाकडे आम्ही फॉर्मची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडे फॉर्म छपाईसाठी निधी नसल्याने आपल्या संघटनेने नागपूरच्या कार्यालाकडे संपर्क केला. हे फार्म मिळविण्यासाठी आपल्या संघटनेने कुणावरही दबाब आणला नाही. त्यांनी सहमती दिल्यामुळेच फार्म छापण्यात आले व सौजन्य म्हणून संघटनेनचे नाव छापण्यात आले. यापूर्वीही माथाडी कामागारांच्या नोंदणीसाठी अशाच प्रकारे फॉर्म छापून घेतले होते. ते सादर केल्यावर त्याच्या पावत्याही याच सुरक्षा मंडळ कार्यालयने दिल्या असताना याच वेळी यावर आक्षेप का यावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या कामागारांच्या नावाने संघटनेविरूद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत, त्या कामगारांनी आपल्यावर दबाव आणून तक्रारी करायला लावल्याच्या आशयाचे शपथपत्र सादर केले आहे. त्यामुळे सरकारी कामगार अधिकाऱ्यांची ही भूमिका कामगारांच्या बाजुची आहे की विरोधातील, याबद्दल आश्चर्य असल्याचे अ‍ॅड. चिपळूणकर म्हणाल्या.

भारतीय मजदूर संघाचीही तक्रार
याबाबत भारतीय मजदूर संघानेही सुरक्षा रक्षक मंडळाकडे तक्रार केली आहे. सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सुरक्षा रक्षकाची नोंदणी करण्याची कार्यवाही नियमाप्रमाणे सुरू आहे. असे असताना विदर्भ प्रहार कामगार संघटनेने कोऱ्या फार्मची मंडळाकडे मागणी केली. फार्म न मिळाल्यामुळे त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून दबाव आणला. परंतु त्यांना प्रतिसाद न दिल्याने त्यांनी स्वत:च मंडळाच्या नावाचा (शासकीय) फार्म स्वत:च्या संघटनेचे नाव टाकून छापून टाकला, असे संघाने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Cheating the security guards by filling a fake form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.