विकासकामांची गुणवत्ता तपासण्याचे काम खासगी एजन्सीकडे
By Admin | Published: May 22, 2014 12:59 AM2014-05-22T00:59:40+5:302014-05-22T00:59:40+5:30
चंद्रपूर शहर महानगरपालिकेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांवर नियंत्रण
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांवर नियंत्रण ठेवून कामाची गुणवत्ता तपासण्याचे काम नागपूरच्या दोन खासगी एजंसीकडे सोपविण्यात आले असल्याची माहिती महापौर संगीता अमृतकर आणि स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांनी सोमवारी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. महानगरपालिकेअंतर्गत कामांचा दर्जा योग्य नसल्याचे सातत्याने विरोधक आणि नागरिकांकडून ओरड सुरू होती. गेल्या काही वर्षात झालेली रस्त्यांची कामे केव्हा करण्यात आली आणि पावसात रस्ते कधी वाहून गेले, हेच कळत नव्हते. त्यामुळे सत्ताधार्यांवर आरोप सुरू होते. भविष्यात असे आरोप होऊ नये म्हणून विकासात्मक कामांचा दर्जा तपासण्यासाठी आता महानगरपालिकेने नागपूरच्या दोन एजंसीकडे काम सोपविले आहे. बांधकाम विभागात उच्च पदावर राहिलेले अधिकारी या एजंसीमध्ये असल्याने तांत्रिकदृष्ट्या विकासात्मक कामांमध्ये काय दोष आहेत, याची माहिती मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले. मूलभूत आणि प्राथमिक सोयीसुविधांसाठी ३0 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या कामांसाठी मनपाला ५0 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ५६.३३ कोटींच्या १७५ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून १७३ कामांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. आचारसंहितेपूर्वी १५३ कामांचे आदेश दिले असून कामे सुरू करण्यात आली आहेत. अतवृष्टीमुळे रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी २५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीतून २९ कामांसाठी निविदा बोलाविण्यात आल्या. त्यापैकी २८ कामांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. आचारसंहितेपूर्वी २७ कामांच्या निविदा दरास स्थायी समितीने ४ मार्च २0१४ रोजी मंजुरी दिली आहे. ही कामेसुद्धा लवकरच सुरु होणार आहेत. नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सन २0१३-१४ साठी चार कोटीचा निधी प्राप्त झाला असून या निधीतील ४८ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सूवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत महानगरातील विविध ठिकाणी विद्युत खांब रस्ता रुंदीकरणामध्ये आलेले असल्याने रस्त्याच्या बाजूला स्थानांतरित करण्यात येणार आहे. यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचा दावा महापौर संगीता अमृतकर आणि स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांनी केला आहे. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे स्मारकाचे कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. तसेच मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून आठ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या नव्या इमारतीमध्ये स्थायी समिती सभागृह आणि आमसभा सभागृह तयार केले जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही सभागृहाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुढील महिन्यात बोलावणार असल्याचेही सांगण्यात आले. पत्रपरिषदेला काँग्रेसचे गटनेते संतोष लहामगे, नगरसेवक राजेश अडूर, नगरसेवक दुर्गेश कोडाम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)