जलस्त्रोतांची होणार रासायनिक जैविक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:29+5:30
स्त्रोतांच्या १० मीटर परिघात गेल्यावर अॅप सुरू करून त्याद्वारे स्त्रोत जिओ टॅग केल्या जाते. त्यानंतर छायाचित्रसह नमुना घेतला जातो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासायनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले, याची माहिती मिळते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्थानिक जलस्त्रोतांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील जलस्त्रोतांची मोबाईल अॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरूवात करण्यात आली. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ७ हजारांपेक्षा अधिक स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम जैविक तपासणी अभियान राबविल्या जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे ८ हजार जलस्त्रोत असून, या सर्व स्त्रोतांची तपासणी केली जाणार आहे. १ आॅक्टोबरपासून अभियानाला सुरूवात झाली. रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात १०० टक्के पूर्ण करण्यात यावे. याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यकांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाईल अॅपद्वारे गोळा करावयाचे आहेत. या पाणी नमुन्यांची रासायानिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोगशाळांतून करण्यात येणार आहे. या अभियानाबरोबरच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत आरोग्य विभागाकडून केल्या जाईल. जलस्त्रोतांच्या सर्वेक्षणादरम्यान प्रपत्र अ, ब, क, तयार करून संबंधीत आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आले असून त्याद्वारे स्त्रोतांचा परिसर, योजनेमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीला पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित करण्यात येणार आहे. त्या आधारे ग्रामपंचायतींना लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तालुकास्तरीय यंत्रणेची बैठक घेऊन शासन निकषाप्रमाणे स्वच्छता सर्वेक्षण करावे व त्याची फेरपडताळणी करण्याचे निर्देश दिले.
ग्रामपंचायतींची जबाबदारी
स्त्रोतांच्या १० मीटर परिघात गेल्यावर अॅप सुरू करून त्याद्वारे स्त्रोत जिओ टॅग केल्या जाते. त्यानंतर छायाचित्रसह नमुना घेतला जातो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासायनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले, याची माहिती मिळते. त्यामुळे ग्रामपंचायतींनी नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्थानिक जलस्त्रोतांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या.
अशी होणार तपासणी
ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांचे सॅटेलाईटद्वारे टॅग करणेसाठी शासनाने नागपूर येथील एमआरएससी या संस्थेला जबाबदारी दिली आहे. जिओफेन्सिंग हे एक मोबाईल अॅप आहे. हे अॅप सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने गोळा करण्यासाठी वापरतात.