छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण नाणी चंद्रपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:13+5:302021-06-23T04:19:13+5:30
शिवराज्याभिषेक दिन विशेष चंद्रपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त काढलेली सुवर्ण नाणी त्या काळातील ...
शिवराज्याभिषेक दिन विशेष
चंद्रपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त काढलेली सुवर्ण नाणी त्या काळातील तेजस्वी इतिहास कथन करणारी आहे. मात्र राज्यात फक्त तीन-चारच नाणी शिल्लक आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील अभ्यासक अशोकसिंह ठाकूर यांनी जतन केलेली शिवरायांची ही सुवर्ण नाणी अभ्यासकांसाठी अनमोल ठेवा आहे.
मराठा सत्तेत इतर प्रदेशातील नाणीही चलनात व खजिन्यात होती, अशी माहिती देऊन अशोकसिंह ठाकूर म्हणाले, त्यामध्ये पादशाही, सनगरी, अच्युतराई, देवराई, रामचंद्रराई, गुटी कावेरी, पात्रे, प्रलखाली, जाडमाळी, ताडपत्री, सुवर्ण होन आदींचा समावेश आहे. इ. स. १६६४ ते १६७४ या दरम्यानच्या काळात शिवाजी महाराजांनी ताम्र नाणी शिवराई व चांदीची नाणी महाराष्ट्रात चलनात आणली होती. परंतु सध्या तरी चांदीची नाणी पाहावयास मिळाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अशी आहेत सुवर्ण नाणी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक हा देदीप्यमान सोहळा होता. राज्यभिषेकाच्या वेळी महाराजांनी प्रचलित केलेल्या सोन्याच्या नाण्याला होन असे म्हटले जाते. नाण्याच्या एका बाजूला ‘श्री राजा शिव’ तर दुसऱ्या बाजूला ‘छत्रपती’ असा मजकूर आहे. या होनचे वजन २.९० ग्रॅम असून व्यास १.३२ सेंटिमीटर आहे. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात नाण्यांचा सुवर्णाभिषेक व सुवर्णतुला करण्यात आली होती. राज्य व्यवहार कोषातही होनचा उल्लेख असल्याची माहिती अभ्यासक ठाकूर यांनी दिली.
छत्रपतींची सुवर्णतुला
तिथीनुसार छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा २३ जून रोजी येतो, याकडे लक्ष वेधून अशोकसिंह ठाकूर म्हणाले, छत्रीपतींची सुवर्णतुला करण्यात आली. हेन्री ऑकझेडनने या तुलेसाठी १६००० होन लागल्याचे नमूद केले तर वेगुर्लेकर डचाच्या वृत्तांत छत्रपत्तीचे वजन १७००० होन भरले असे लिहून ठेवले आहे. यावरून राज्यभिषेकाप्रसंगी छत्रपतींचे वजन १५० पौंड असावे. म्हणजेच छत्रपतींचे होन सुवर्ण नाणी मुबलक प्रमाणात पाडली गेली होती.