चंद्रपुरातील कुटुंबावर छत्तीसगडच्या जातपंचायतीचे बहिष्काराचे फर्मान; मुलींनीच दिला पित्याला खांदा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:13 AM2021-06-09T10:13:03+5:302021-06-09T10:13:49+5:30
Chandrapur : या प्रकरणी तक्रारीवरून मंगळवारी जातपंचायतीच्या छत्तीसगडमधील दोन व विदर्भातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चंद्रपूर : घरात दारिद्र्य आणि त्यातच २० वर्षांपासून बहिष्कृत जीवन जगताना आजाराने वडिलाचा रविवारी मृत्यू झाला. अखेरचा खांदा द्यायला समाज आला नाही. चंद्रपुरात गोंधळी (जोशी) समाजाची केवळ तीनच कुटुंबे आहेत. एवढ्या मोठ्या शहरात हे कुटुंब सहजपणे सुख-दु:ख वाटून घेऊ शकले असते. मात्र, बहिष्काराचे फर्मान बिलासपूर-रायपूर येथून आले आणि सर्वच दुरावले. या प्रकरणी तक्रारीवरून मंगळवारी जातपंचायतीच्या छत्तीसगडमधील दोन व विदर्भातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चंद्रपुरातील भंगाराम वॉर्डात मृत प्रकाश गणपत ओगले यांचे कुटुंब राहते. त्यांना सात मुली व दोन मुले आहेत. एक मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. प्रकाश ओगले यांचा २० वर्षांपूर्वी समाजातीलच मुलीशी विवाह झाला होता. त्यावेळी जातपंचायत उपस्थित होती. काही दिवसानंतर आर्थिक स्थिती बिघडल्याने ओगले राजुरा येथे वास्तव्य करू लागले. समाजाशी संपर्क कमी झाला.
आर्थिक परिस्थिती थोडी बरी होऊ लागल्यानंतर पुन्हा समाजात वावर सुरू केला. त्यांची भाची व पुतण्याच्या लग्नासाठी जातपंचायतने सहकार्य केले होते. मात्र, जातपंचायतीशी संबंधित सुरेश वैराळकर महाजन या नागपूर येथील व्यक्तीने प्रकाश यांचे वडिल गणपत ओगले यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर बहिष्काराचा आदेश दिला. तेव्हापासून प्रकाश व त्यांचा भाऊ यांचे कुटुंब बहिष्कृत जीवन जगत आहेत.
मुलींनीच दिला पित्याला खांदा
प्रकाश ओगले यांचा रविवारी मृत्यू झाल्यानंतर पीडित कुटुंबाने अंत्यसंस्काराबाबत जातपंचायतीला खूप गयावया केली. पण तुमचे वडील बहिष्कृत आहेत. त्यामुळे आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, असे फर्मान रायपूर व बिलासपूर येथील जातपंचायतीने काढले. त्यामुळे वडिलांच्या पार्थिवाला आम्हीच खांदा देऊन जातपंचायतीचा निषेध केला, अशी माहिती ओगले यांच्या सात मुलींनी दिली.
संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिला. पण जातपंचायत आजही टिकविण्यामागे काहींचा स्वार्थ आहे. माझ्या बाबांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी समाज आला नाही. आम्ही भगिनींनी विधी पार पाडला. अनिष्ट प्रथांविरुद्ध यापुढेही लढत राहू.
-जयश्री प्रकाश ओगले, मृताची मुलगी