ब्रह्मपुरीत छोरा-छोरीची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:28 AM2017-10-22T00:28:42+5:302017-10-22T00:28:53+5:30
दंगल चित्रपटात मुला-मुलींची दंगल दाखवून मुलींना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात आले होते. ब्रह्मपुरीतील पेठवॉर्डात दिवाळीच्या पाडव्याला कुस्तीचे आयोजन करण्याची प्रथा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी: दंगल चित्रपटात मुला-मुलींची दंगल दाखवून मुलींना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात आले होते. ब्रह्मपुरीतील पेठवॉर्डात दिवाळीच्या पाडव्याला कुस्तीचे आयोजन करण्याची प्रथा आहे. यंदा यात मुला-मुलींची कुस्ती खेळविण्यात आली. हे पाहून अनेकांना दंगल चित्रपटाची आठवण झाली.
जय बजरंग गणेश मंडळ पेठवॉर्ड येथे २५-३० वर्षापासून दिवाळीच्या पाडव्याला कुस्तीचे आयोजन केले जाते. परंतु मुलाविरुद्ध मुलगाच अशाच कुस्ती यापूर्वी पाहावयास मिळत होत्या. यावर्षी मुलाविरुध्द मुलींची कुस्ती खेळविण्यात आली. सर्वांना अंचबित करणाºया या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे. कुर्झा येथील प्रांजल धनजोडे या मुलीने कुस्तीत उतरुन एका मुलाला आव्हान दिले. हे पाहून दंगल चित्रपटाची सर्वांना आठवण झाली.
मुलींना प्रत्येक क्षेत्रात वाव आहे. त्यांनी त्या दृष्टीने स्वत:ला तयार करण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे. हे दंगल चित्रपटात दाखविण्यात आले होते. हा संदेश प्रांजलने मनावर घेऊन कुस्तीसाठी तिने स्वत:ला तयार केले. राज्यस्तरावर पोहचण्याची तिची इच्छा आहे. पेठवॉर्डातील या दंगलीत प्रांजलने अखेरपर्यंत एका मुलाला कडवी झुंज दिली. ती शेवटच्या टप्प्यात हरली. परंतु आयोजन मंडळाने तिच्या या धाडसाची नोंद घेत तिचा सत्कार घडवून आणला. यावेळी क्षणभर भावुक वातावरण निर्माण झाले होते. प्रांजल ही आज दंगल हरली असली तरी ती उद्याची चमकणारी तारा आहे, असे अनेकांनी बोलून दाखविले. ब्रह्मपुरी तालुक्यात ती अनेक खेळात राज्य व राष्टÑीय पातळीवर चमकली आहे.कुस्तीतही ती मागे नाही, हे तिने दाखवून दिले.
या कुस्तीचे आयोजन ओमसागर उरकुडे, अनंता उरकुडे, शंकर डोईजड, सुभाष उपासे, दिवाकर कुथे, प्रा. किशोर हजारे, सोमेश्वर उपासे, महेश भर्रे, अजय राऊत व जय बजरंग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.