मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली किल्ला स्वच्छतेची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:47 PM2018-08-31T22:47:12+5:302018-08-31T22:47:37+5:30
इको- प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानासंदर्भात इको- प्रोच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इको- प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानासंदर्भात इको- प्रोच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी इको-प्रोच्या शिष्टमंडळाकडून अभियानाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी चंद्रपूर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ल्यास भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी इको-प्रो किल्ला स्वच्छता अभियानचे कौतुक करीत चंद्रपूरला भेट देण्याचे आश्वासन इको - प्रोच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी आमदार नाना शामकुळे, इको- प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, इको- प्रोच्या पुरातत्व विभागाचे प्रमुख रविंद्र गुरनुले, नितीन रामटेके, राजू काहिलकर उपस्थित होते. इको - प्रो संस्थेच्या वतीने मागील वर्षी १ मार्च २०१७ रोजी सुरू करण्यात आलेल्या चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान ५०० दिवस पूर्ण होत आहे. मागील ५०० दिवसांपासून नियमितपणे रोज सकाळी श्रमदान करण्यात येत आहे. किल्ला स्वच्छतेसोबत किल्ला पर्यटनास चालना मिळावी म्हणून इको -प्रोच्यास वतीने ‘हेरीटेज वॉक’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आलेली आहे. यास चंद्रपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूर किल्ल्याची पूर्वीची आणि स्वच्छतेनंतरची छायाचित्रे, वृत्तपत्र बातम्या, किल्ला पर्यटनाबाबत अधिक माहिती जाणून घेतली. ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला आणि इतिहास या निमित्ताने नागरिकांना अनुभवास मिळत आहे. संपूर्ण किल्ला स्वच्छता अभियानाची माहिती असलेली पुस्तिकासुध्दा यावेळी भेट देण्यात आली. तसेच अभियानास आवश्यक सहकार्य करण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.