मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 11:37 AM2021-09-24T11:37:41+5:302021-09-24T12:14:55+5:30
चंद्रपूर जिल्ह्यतील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला. वाघांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओकॉलर बसवून हालचालींवर लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याने वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपणाचा लाभ देणाऱ्या योजनेच्या मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्या. यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावासही त्यांनी मंजुरी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यतील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. यावेळी वाघांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओकॉलर बसवून हालचालींवर लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यत वाघांची संख्या वाढत असल्याने निर्माण होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षांवर उपाययोजना सुचवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने यासंदर्भात आपले धोरण निश्चित करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत सध्या ९३९ गावांचा समावेश असून योजनेत आणखी काही गावांचा समावेश करण्यात यावा तसेच योजनेत स्थानिकांना उपयुक्त ठरणाऱ्या आणखी कोणत्या गोष्टी देता येतील याचा विचार केला जावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यतील वाढती वाघांची संख्या व होत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष याची माहिती यावेळी दिली.
सोलर बोअरवेल
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत वनालगत असलेल्या पाच संवदेनशील गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वन सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यत २१८ ठिकाणी सोलर बोअरवेल तयार करून त्यावर खोदतळे तयार करण्यात यावेत. यासाठी लागणारा ६ कोटी रुपयांचा खर्च कॅम्पा निधीतून करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सहा ठिकाणी जंगल सफारी सुरू ठेवण्यात आली असली तरी निसर्ग पर्यटनाला असलेला वाव लक्षात घेवून आणखी स्थळांचा शोध घेण्यात यावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.