मुख्यमंत्री योजनेतून होणार २६६ कि.मी.चे रस्ते

By admin | Published: August 3, 2016 01:45 AM2016-08-03T01:45:21+5:302016-08-03T01:49:15+5:30

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तयार करण्यात आली आहे.

Chief Minister will get 266 km roads | मुख्यमंत्री योजनेतून होणार २६६ कि.मी.चे रस्ते

मुख्यमंत्री योजनेतून होणार २६६ कि.मी.चे रस्ते

Next

पहिल्या टप्प्याला मंजुरी
चंद्रपूर : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आहे. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामीण रस्त्यांचे नियोजन तयार केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यामध्ये तब्बल २६६ किलो मीटर लांबीच्या रस्त्यांचे काम केले जाणार आहे. त्याअंतर्गत ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नतीची कामे केली जाणार आहेत.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली. ती योजना पुढे काँग्रेस सरकारच्या दोन कार्यकाळात कायम ठेवण्यात आली. त्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते तयार करून लहानात लहान गाव मुख्य रस्त्याला जोडण्यात आले. सध्या जिल्ह्यात एकही गाव असे नाही, ज्या गावाला रस्त्या नाही. खडीकरण, कच्चा किंवा डांबरी अशा प्रकारच्या रस्त्यांनी सर्व गावे मुख्य रस्त्याला जोडली गेली आहेत. मात्र, दीड वर्षांपूर्वी केंद्रमध्ये भाजपचे नवीन सरकार सत्तेवर आल्यावर निधी देण्यात आला नाही. परिणामी रस्त्यांची कामे केलेल्या कंत्राटदारांची २२ कोटी रुपये थकबाकी झाली.
दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी महाराष्ट्राला निधी उपलब्ध केला. त्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या थकबाकी २२ कोटी रुपयांपैकी १० प्राप्त झाले. कंत्राटदारांना हे १० कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला निधी उपलब्ध केला नाही. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण रस्त्यांचे काम मागे पडू नये, याकरिता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राज्यात लागू केली. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये काम केले जाणार आहे. (प्रतिनिधी)

पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७४ किलो मीटरचे २१ रस्ते तयार करण्यात येत आहे. हे सर्व रस्ते आधीच तयार आहेत. त्याची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. २१ रस्त्यांचे १२ पॅकेजेस् तयार करण्यात आले आहे. त्यातील ११ पॅकेजस्ना मंजुरी मिळाली आहे. एका पॅकेजमध्ये दोन वा तीन रस्त्यांचा समावेश आहे. चार पॅकेजेस्ना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्याचे वर्क आॅर्डर पुढील आठवड्यात देण्यात येत आहेत.

पीएमजीएसवायपेक्षा मुख्यमंत्री ग्रामसडकचे निकष वेगळे
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये (पीएमजीएसवाय) ५०० लोकवस्तीच्या गावांची निवड करून ती गावे जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांशी जोडण्यात आली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ५०० लोकसंख्येसह २५० लोकसंख्या असलेल्या गावांचीही निवड करण्यात आली आहेत. या गावांना मुख्य रस्त्याला जोडताना गुणांक देण्यात आले आहेत. सर्वाधिक गुण असलेल्या गावाला आधी रस्ता दर्जोन्नती केली जाईल. त्या गावामध्ये शाळा, बँक शाखा, प्राथमिक आरोग्य केंद्र, सांस्कृतिक भवन, समाज मंदिर, बाजारपेठ अशा निकषांवर गुण देण्यात आले आहेत.

सिंदेवाही-सावलीसाठी चौथा कॉल
पहिल्या टप्प्यात ११ पॅकेजेस् मार्गी लागले आहेत. मात्र, एका पॅकेजेला कंत्राटदारांना प्रतिसाद नाही. हा पॅकेज सिंदेवाही व सावली तालुक्यातील रस्त्यांचा आहे. या पॅकेजची चौथ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. ती भरण्यासाठी ८ आॅगस्टपर्यंत अतिंम मुदत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ३६ कोटी रुपयांचे काम केले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरू
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात तब्बल १९२ किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून माहिती घेण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामासाठी शासन कर्ज उचल करण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन या टप्प्याचे तीन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात ७६ किलो मीटरचे काम केले जाईल. दुसऱ्या भागात ८१ किलो मीटर आणि तिसऱ्या भागात ३५ किलो मीटरचे काम केले जाणार आहे.

 

Web Title: Chief Minister will get 266 km roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.