मुख्यमंत्र्यांचा १२ शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:52 PM2019-01-14T22:52:34+5:302019-01-14T22:52:49+5:30
जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने नोकरी सोडून शेतीमध्ये केलेल्या अभिनव प्रयोगाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाची थाप दिली आहे. वर्षाला लक्षावधी रूपये कृषी यांत्रिकीच्या साहाय्याने मिळवत असलेल्या विनोद मारूती कोटकर यांना ‘वाह, छान शेती करता तुम्ही!’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शाबासकी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने नोकरी सोडून शेतीमध्ये केलेल्या अभिनव प्रयोगाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाची थाप दिली आहे. वर्षाला लक्षावधी रूपये कृषी यांत्रिकीच्या साहाय्याने मिळवत असलेल्या विनोद मारूती कोटकर यांना ‘वाह, छान शेती करता तुम्ही!’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शाबासकी दिली.
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी व कृषी संलग्न क्षेत्रातील योजनांचा कशा पद्धतीने लाभ होतो. या संदर्भात लाभार्थ्यांसोबत आज महासंवाद या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुंबईतील स्टुडिओमधून संपर्क साधला. जवळपास तीन तास त्यांनी शेतकऱ्यांशी वार्तालाप केला.
यावेळी विनोद कोटकर यांनी एका कंपनीतील नोकरी सोडून स्वत:च्या शेतीमध्ये राबायला कशी सुरुवात केली आणि बीएससी एग्रीकल्चर असल्यामुळे त्याच्या ज्ञानाचा त्यांना कसा फायदा झाला, याबाबतची माहिती दिली. सोबतच दुसरे शेतकरी मधुकर चिंधुजी भलमे यांच्याशीदेखील संवाद साधला. भलमे यांनी पांदण रस्ते बनविताना शेततळ्यातील मुरूम वापरण्यात यावा, त्यामुळे शेततळे खोलीकरण सहज शक्य होईल, अशी एक सूचना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात झालेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकत्रित आलेले सर्व शेतकरी कुठल्या ना कुठल्या योजनेचे लाभार्थी होते. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या व्हिडिओ कॉन्फरसिंगनंतर सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले.
या शेतकऱ्यांनी साधला संवाद
उसगाव येथील मंगेश मारुती आसुटकर, चोरगाव येथील पांडुरंग गोपाळ कोकोडे, चारगाव येथील मधुकर चिंधुजी भलमे, दादापूर येथील विनोद मारुती कोटकर, शेगाव येथील पंचफुला सुखदेव गायकवाड, वडगाव येथील विक्रम मारोती भोयर, पाटाळा येथील संदीप मुकुंदराव एकरे, चिरादेवी येथील लक्ष्मण नानाजी वासेकर, चकबापूर येथील गजानन विठोबा काळे, मोहबाडा येथील दत्तू विठ्ठल कापसे, शेगाव येथील सखुबाई मधुकर दोहतरे, वेंडली येथील नंदा शंकर पिंपळशेंडे या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
सरस महोत्सवाचा आज समारोप
शुक्रवारपासून चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राउंडवर सुरू असलेल्या जिल्हा कृषी व सरस महोत्सवाचा समारोप मंगळवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहतील. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य ना. गो. गाणार, विधानपरिषद सदस्य रामदास आंबटकर, आमदार विजय वडेट्टीवार, आ. सुरेश धानोरकर, आ.संजय धोटे, आ. कीर्तीकुमार भांगडिया उपस्थित राहणार आहेत..