चंद्रपूर जिल्ह्यात बालमृत्यू आले अर्ध्यावर
By admin | Published: July 17, 2016 12:36 AM2016-07-17T00:36:34+5:302016-07-17T00:36:34+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील बालमृत्यू अर्ध्यावर आले आहेत.
विविध योजनांचा परिणाम : व्हीसीडीसीतील बालकांमध्येही सुधारणा
मिलिंद कीर्ती चंद्रपूर
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील बालमृत्यू अर्ध्यावर आले आहेत. ग्राम बाल विकास केंद्रातील (व्हीसीडीसी) प्रगती अहवालदेखील जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला दिलासा देणारा आहे. व्हीसीडीसीत दाखल १३६ बालकांपैकी ६१ टक्के बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. राजमाता जिजाऊ पोषण मिशन, आशा वर्कर, मानव विकास मिशन, आरबीएसके अशा विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य आदिवासी व इतर नागरिकांना मिळत असल्याने कुपोषणाची आकडेवारी घटली आहे.
गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) राबविण्यात येत आहे. एनआरएचएमच्या माध्यमातून जिल्हात पायाभूत आरोग्य सुविधा आणि महिला व बालकांना विविध लाभ देण्याकरिता निधी उपलब्ध केला जातो. याशिवाय जननी सुरक्षा योजनेच्या माध्यतातून आशा वर्कर गरोदर महिलांची प्रसूती शासकीय दवाखान्यात होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. बालकाच्या जन्मानंतर ४२ दिवस त्याची निगरानी आशा करीत असतात. मानव विकास मिशनअंतर्गत प्रसूतीपूर्व सातव्या महिन्यात महिलेला दोन हजार रुपये आणि प्रसूतीनंतर दोन हजार असे एकूण चार हजार रुपयांचे अनुदान गरोदार महिलांची काळजी घेण्यासाठी लाभार्थ्यांना दिले जाते. बाळ आजारी पडल्यास एक वर्षपर्यंत आशा वर्कर लक्ष ठेवून असते. त्याला वेळेवर उपचार मिळावे, यासाठी आशा वर्कर लाभार्थ्याला सर्व उपचार मोफत मिळण्यासाठी दुवा म्हणून काम करीत असते. या सर्व उपाययोजनांचे आता सकारात्मक परिणाम दिसून लागले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१४-१५मध्ये जिल्ह्यात उपजतमृत्यूसह ८१३ बालमृत्यू झाले होते. त्या तुलनेत यावर्षी त्याच्या अर्धे म्हणजे ४६५ बालमृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी आरोग्य विभागाने राबविलेल्या योजनांना मिळालेली पावती आहे. याशिवाय मार्च-२०१६मध्ये व्हीसीडीसीमध्ये सहा महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतची १३६ बालके दाखल करण्यात आली होती. त्यापैकी ८३ बालकांमध्ये सुधारणा दिसून आली. त्यापैकी २६ बालकांच्या वजनात ५ ते १० टक्के वाढ आणि ५७ बालकांच्या वजनात १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
या सुधारित वजनाच्या बालकांचे प्रमाण ६१ टक्के आहे. उर्वरित ५३ बालकांच्या वजनात पाच टक्क्यांपेक्षाही कमी वाढ झाली आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील एनआरसीमध्ये ४६ बालके दाखल करण्यात आली होती. त्यापैकी २५ बालकांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात ब्रह्मपुरी, वरोरा, मूल येथील सीटीसीचे आकडे उपलब्ध करण्यात आले असून त्यामध्ये ब्रह्मपुरीत दाखल सर्व चार बालकांमध्ये सुधारणा दिसून आली. वरोऱ्यात चारपैकी दोन बालकांमध्ये सुधारणा आणि मूलमध्ये १० बालकांपैकी पाच बालकांमध्ये सुधारणा झाली.
गेल्या १०-१२ वर्षांत चांगल्या दर्जाच्या बाल आरोग्य योजना राबविण्यात आल्या. शासनस्तरावरून प्रसूती दवाखान्यातच होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. ग्रामीण भागातील आजारी बालके शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले जातात. त्यामुळे ग्रामीणपेक्षा शहरी बालमृत्यू अधिक दिसतात.
- डॉ. श्रीराम गोगुलवार,
जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.
कुपोषण कमी होण्यासाठी व्हीसीडीसीमध्ये बालकांवर लक्ष ठेवण्यात येते. गरोदर मातांची काळजी घेण्याचे काम आशा वर्कर करीत असतात. महिला व बालकांना योग्य पोषण आहार दिला जातो. यातून सॅम व मॅमधील बालकांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे.
- विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला व बालकल्याण), जि.प. चंद्रपूर.
दरहजारी ३.३२ बालमृत्यू
जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९५५ बालकांपैकी दरहजारी बालमृत्यूचे प्रमाण काढण्यात आलेले आहे. त्यामध्ये या वर्षीचे ४६५ बालमृत्यू दरहजारी केवळ ३.३२ आहे. हे प्रमाण गेल्यावर्षी दरहजारी ५.०९ होते. यावर्षी ग्रामीण भागात दरहजारी १.४९ बालमृत्यू आणि शहरी भागात दरहजारी १२.११ बालमृत्यू झाले आहेत. तेच प्रमाण गेल्या वर्षी ग्रामीण भागात १.७५ व शहरी भागात २३.८५ दरहजारी होते.