चिमुरातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:09 AM2017-11-04T00:09:54+5:302017-11-04T00:10:05+5:30
चिमूर नगर परिषदेतील स्थानिक प्रभाग क्र. १२ मधील चिमूर-वरोरा मार्गावरील शासकीय जागेवर तीन अतिक्रमणधारक दुकाने थाटून व्यवसाय करत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर नगर परिषदेतील स्थानिक प्रभाग क्र. १२ मधील चिमूर-वरोरा मार्गावरील शासकीय जागेवर तीन अतिक्रमणधारक दुकाने थाटून व्यवसाय करत होते. दरम्यान नागरिकांनी तक्रार केल्याने महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करून शुक्रवारी हे अतिक्रमण हटविले.
नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये अतिक्रमणधारकांनी तारांचे कुंपण तयार करून ये-जा करण्याचा मार्ग बंद केला होता. हुतात्मा स्मारक आणि गंगाधर नेवुलकर यांच्या घरासमोर अतिक्रमण करून काहींनी चिकणचे दुकान थाटले होते. तसेच तहसील प्रशासनाच्या जागेवर सद्भावना हॉटेल उभारून अनेक दिवसांपासून व्यवसाय सुरू होता. त्यामुळे नागरिकांनी या दुकानदारांविरुद्ध तक्रारी केल्या. मात्र, अतिक्रमणधारकांची मनमानी सुरूच होती. नगर परिषद प्रशासनाने तक्रारींची दखल घेत महसूल विभागाकडे पत्रव्यवहार केला. शिवाय अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवून जागा रिकामीचे आदेश दिले होते. अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाला यश आले. अतिक्रमण हटाव कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी मनोजकुमार शहा, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार संजय नागतिलक आदींनी केली.