डासांचे उत्पत्ती केंद्र आता बनले बालोद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:39 PM2018-02-05T22:39:26+5:302018-02-05T22:40:59+5:30

चंद्रपुरातील डम्पिंग यार्ड म्हणजे घाणीने बरबटलेला प्रदेश. येथील घाणीची प्रचिती तेथील पाच-सहा किलोमीटर परिसरात यायची.

Children born of mosquitoes are now grown | डासांचे उत्पत्ती केंद्र आता बनले बालोद्यान

डासांचे उत्पत्ती केंद्र आता बनले बालोद्यान

Next
ठळक मुद्देमनपाचे स्वच्छता अभियान : डम्पिंग यार्डचा कायापालट

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपुरातील डम्पिंग यार्ड म्हणजे घाणीने बरबटलेला प्रदेश. येथील घाणीची प्रचिती तेथील पाच-सहा किलोमीटर परिसरात यायची. बल्लापूर बायपास मार्गावर चंद्रपूरला लागूनच हे डम्पिंग यार्ड असल्याने येथील घाणीचा चंद्रपूरच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत होता. या मार्गाने मार्गक्रमण करणाºयाला नाकावर रुमाल ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता. संपूर्ण यार्डच डासांचे उत्पत्ती केंद्र झाले होते. ओला, सुका कचरा, प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स आणि हॉटेल्स, कॅटररचे शिळे अन्नपदार्थ येथेच टाकले जात असल्याने यार्डमधून प्रचंड दुर्गंधी यायची. आता मात्र या ठिकाणी बालोद्यान तयार झाले आहे.
चंद्रपुरात नगरपालिका अस्तित्वात असतानाच या ठिकाणी शहरातील केरकचरा टाकला जायचा. कालांतराने येथेच डम्पींग यार्ड तयार झाले. चंद्रपूर- बल्लारपूर बायपास मार्गावर हे डम्पींग यार्ड आहे. चंद्रपूर महानगराचा विस्तार वाढल्याने या डम्पींग यार्डच्या आजूबाजूला वसाहत आहे. तब्बल २० एकरावर डे डम्पींग यार्ड विस्तारले असून, शहरातून रोज गोळा केला जाणारा सव्वाशे टन कचरा यात साठवला जातो.
मात्र, गेल्या काही वर्षापासून या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने कचºयाचे डोंगर येथे निर्माण झाले. परिणामी या कचराच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचा श्वास कोंडला जायचा. बायपास मार्गाने जाणाऱ्यांनाही नाक दाबूनच पुढचा प्रवास करावा लागत होता, असे चित्र होते. मात्र गेल्या काही महिन्यात या डम्पिंग यार्डचे रुपडे पालटल्याचे दिसून येते.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने डम्पिंग यार्डमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासोबतच येथे सुंदर बागेची निर्मिती केली आहे. स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती व्हावी, नागरिकांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी हा हेतू समोर ठेवून येथे बागेची निर्मिती करण्यात आली.
कचºयाच्या योग्य व्यवस्थापनासह भंगार आणि कचºयातील साहित्यातून बागेच्या सौंदर्यात भर घालण्यात आली आहे.
यासाठी टायर, प्लास्टिकचे साहित्य, भंगारातील लोखंड वापरण्यात आले. स्वच्छतेविषयी संदेश देणारे अनेक फलक या बागेत लक्ष वेधून घेत आहे. गांडूळ खत प्रकल्पही येथे तयार करण्यात आला असून वर्षानुवर्षापासून तयार झालेले कचºयाचे ढिगही आता कमी होऊ लागले आहेत.
सेल्फी पार्इंटचे तरुणाईला आकर्षण
या डम्पींग यार्डचे सौंदर्यीकरण केल्यानंतर यार्डमध्येच एक सेल्फी पार्इंट तयार करण्यात आला आहे. हा सेल्फी पार्इंट शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवकांना भूरळ घालताना दिसत आहे. जुन्या टायरला रंगीबिरंगी रंगवून त्यात झाडे लावण्यात आली आहेत. बसण्यासाठी बेंच लावण्यात आले आहेत. याशिवाय काही प्राण्यांच्या प्रतिमाही येथे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत. प्लॉस्टिकपासून तयार करण्यात आलेले बेंच, पेवर ब्लॉक या ठिकाणी सौंदर्यीकरणासाठी वापरण्यात आले आहेत. त्यामुळे डम्पींग यार्डचे बदलेले सौंदर्य बघण्यासाठी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुणांची येथे गर्दी होऊ लागली आहे. परिसरातील नागरिकही सकाळी, संध्याकाळी येथे शतपावलीसाठी येताना दिसून येत आहे. कचºयाचे व्यवस्थापन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि स्वच्छतेची आवड निर्माण करण्यासाठी ही बाग चंद्रपूरकरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
रस्त्याच्या दुतर्फा लावली झाडे
येथील डम्पींग यार्डमध्ये लाखो टन कचरा यापूर्वी अस्ताव्यस्त विखुरलेला होता. दररोज कचरा टाकताना सफाई कामगारांकडूनही वाट्टेल तसा कचरा टाकला जायचा. मेलेली जनावरे, मच्छी, मटण मार्केटमधील वेस्ट याच ठिकाणी टाकला जायचे. त्याच्या नियोजनाकडे पूर्वी नगरपालिका आणि त्यानंतर मनपानेही लक्ष दिले नाही. मात्र आता स्वच्छता अभियानाबाबत मनपा गंभीर झाल्याने यार्डमधील कचरा आणि कचºयाचे डम्पींग व्यवस्थित व्हावे, यासाठी येथे सिमेंट रस्ता तयार करण्यात आला असून, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली आहे. त्यामुळे येथे वरकरणी पाहताना आता आल्हाददायक वाटू लागले आहे.
व्यवस्थापन प्रकल्प उभे राहावे
डम्पिंग यार्डमधील कचऱ्याची विल्हेवाट आणि योग्य नियोजन व्हावे, यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करण्याचे मनपाने ठरविले. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र कुणीही प्रतिसाद दिला नाही. वारंवार निविदा काढल्या. अखेर नागपूर येथील एका कंपनीने निविदा भरली आणि या कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंत्राटदाराने काही दिवस कामही केले. मात्र पुढे हा कंत्राटदारही काम सोडून पळाला. आता नव्याने घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट देण्याची गरज आहे.

Web Title: Children born of mosquitoes are now grown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.