वडिलांच्या नोकरीसाठी मुलांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:22+5:302021-07-15T04:20:22+5:30
९०० कामगारांचा प्रश्न ऐरणीवर : नारांडा येथे आंदोलन सुरूच रत्नाकर चटप नांदाफाटा : पूर्वी मुरली एग्रो सिमेंट नावाने असलेली ...
९०० कामगारांचा प्रश्न ऐरणीवर : नारांडा येथे आंदोलन सुरूच
रत्नाकर चटप
नांदाफाटा : पूर्वी मुरली एग्रो सिमेंट नावाने असलेली कंपनी दालमिया कंपनी नावाने सुरू झाली आहे. पूर्वी काम केलेल्या कामगारांना स्थायी करून घेण्यात यावे, यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून नारंडा येथे कामगारांचे आंदोलन सुरू आहे.
कोरपना तालुक्यात असलेल्या पूर्वीच्या मुरली एग्रो या कंपनीत जवळपास ९०० कामगार ‘स्थायी कामगार’ म्हणून काम करीत होते. सहा वर्षांपूर्वी कंपनी बंद पडली. त्यानंतर सर्व कामगार बेरोजगार झाले. स्थायी म्हणून असलेल्या कामगारांना नवीन दालमिया सिमेंट कंपनीत स्थायी नोकरीत सामावून घ्यावे, याकरिता आंदोलन सुरू आहे. मात्र अजूनही कामगारांचे प्रश्न ऐरणीवर असून, गेल्या नऊ दिवसांपासून वडिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बायकांसह चिमुकली मुले रस्त्यावर उतरलेली दिसत आहेत. शाळकरी मुले आंदोलनस्थळी न्यायासाठी आक्रोश करताना दिसत आहेत. अद्याप कंपनी प्रशासनाकडून स्थायी नोकरीत सामावून घेण्यासाठी पावले उचललेली दिसत नाहीत. वेतन मिळत नसल्याने कामगारांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या सहा वर्षांपासून मिळेल ते काम करून कामगारांनी कशीबशी पोटाची भूक मिटवली. मुलांचे शिक्षण, आई-वडिलांची जबाबदारी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या सगळ्या समस्या आ वासून उभ्या असताना दालमिया सिमेंट कंपनी मात्र स्थायी स्वरूपात कामगारांना घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आता कामगार करीत आहेत. वारंवार चर्चा होऊनही कामगारांना स्थायी न केल्यामुळे शेवटी कामगार कुटुंबासह आता रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. मुरली एग्रो सिमेंट कंपनीत सहा वर्षे काम केल्यानंतरही सामावून घेत नसल्याने न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न आता कामगारांपुढे आहे.