उन्हाळ्यात मुलाचे जेवण झाले कमी; मुलांना काय खाऊ घालाल ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:46 IST2025-03-20T14:45:22+5:302025-03-20T14:46:09+5:30
पालकांनो ऐका बालरोगतज्ज्ञांचा सल्ला : तज्ज्ञांकडे समस्या वाढल्या

उन्हाळ्यात मुलाचे जेवण झाले कमी; मुलांना काय खाऊ घालाल ?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कडाक्याचे ऊन आणि अंगाची होणारी लाही लाही, यामुळे उन्हाळ्यात जीव कासावीस होऊन जातो. या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाणही खूप वाढते. त्यामुळे भूक मंदावते आणि ओबड-धोबड खाण्यात आल्याने पचन क्षमताही बिघडते. म्हणून या असह्य उन्हाळ्यात शरीराला थंडावा देईल असा, योग्य व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रणाली ढवस यांनी दिला आहे.
चंद्रपूर शहराचे तापमान देशात सर्वोच्च पातळीवर असते. सकाळपासून तप्त उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होत असते. वातावरणात होणाऱ्या बदलांप्रमाणे शरीरही बदल करते. उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता मॉईश्चरायझर शोषूण घेते. अशा दिवसात शरीरात थंडावा राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी पिल्या जाते. परिणामी, आपसूकच भूक कमी होते. तरीही अध्येमध्ये खाणे गरजेचे आहे.
कशामुळे होत नाही जेवणाची इच्छा
उष्णता आणि तीव्र उष्णतेच्या लाटांमुळे भूक कमी होते. गळा सुखत असते. जास्त पाणी पिण्याची इच्छा होते. त्यामुळे भूक लागत नाही व जेवणाची इच्छा होत नाही.
उन्हाळ्यातील आहार कसा असावा !
उन्हाळ्याच्या दिवसात ताजे, पचायला हलके असणाऱ्या पदार्थाचा आहारात समावेश करा. आहारात हिरव्या भाज्या, ज्वारी, नाचणी, कडधान्ये, वरणभात या हलक्या पदार्थांचा तसेच दूध, तूप, दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. आहारात सलादाचा वापर असावा.
पोरगा जेवत नाहीय, खेळातच लक्ष
आजकाल प्रत्येकच पालकांची तक्रार असते की, मुलगा जेवण करत नाही त्याचे संपूर्ण लक्ष खेळातच असते. मोबाइल दिल्याशिवाय जेवतच नाही, तर उन्हाळ्यात मुलगा जेवत नाही याबाबतच्या बऱ्याच तक्रारी बालरोगतज्ज्ञांकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे.
टोमॅटो, काकडी पदार्थ द्या
या दिवसात कलिंगड, संत्री, मोसंबी, द्राक्ष, अननस, सफरचंद ही हंगामी फळे किंवा शक्य झाल्यास याचा ताजा ज्यूस घ्यावा. लिंबू पाणी, ताक, शहाळे, नाचणीची आंबील, कैरीचे पन्हे यांचेही सेवन करावे. टोमॅटो, कांदा, काकडी, गाजर, पुदिना, कलिंगड या ग्रीनरेड सॅलेडचा आहारात समावेश करावा.
"तप्त उन्हाच्या झळामुळे भूक मंदावणे ही बाब स्वाभाविक असते, तरीही शरीराला आवश्यक तेवढा आहार घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीर ताजे-तवाणे ठेवण्यासाठी रसदार फळे खावे, भरपूर पाणी प्यावे, तसेच आवश्यक तेवढे थोड्या-थोड्या वेळांनी खावे, एकाच वेळेस भरपूर अन्न खाऊ नये, त्यामुळे पचनसंस्था बिघण्याची शक्यता असते."
- डॉ. प्रणाली ढवस, बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर